scorecardresearch

भाषासूत्र : घन:श्याम नव्हे, घनश्याम!

घन:श्याम.’ या वाक्यरचनेत महत्त्वाची चूक आहे- बोलताना उच्चारात चूक होत नाही, पण लिहिताना होणारी चूक अनेकांकडून वारंवार होते

‘‘दादा, तुला मी कितीदा सांगितलं माझ्या मित्राचं नाव, पण तू सारखा विसरतोस! आता तुला लिहूनच देतो- ‘माझ्या मित्राचे नाव आहे- घन:श्याम.’ या वाक्यरचनेत महत्त्वाची चूक आहे- बोलताना उच्चारात चूक होत नाही, पण लिहिताना होणारी चूक अनेकांकडून वारंवार होते. ही चूक आहे ‘घन:श्याम’ या शब्दात. हा शब्द आहे- ‘घनश्याम’ या शब्दातील ‘न’ या अक्षरानंतर विसर्ग (:) देणे चुकीचे आहे. ही लिखाणात होणारी चूक माझ्या एका विद्यार्थिनीला सांगितली, तर ती म्हणाली, ‘‘अहो बाई, ‘न’नंतर विसर्ग हवाच. आपण हा शब्द घन:श्याम असाच उच्चारतो, म्हणजे ‘न’वर जो आघात देतो त्याचं लिखाणात ‘घन:’ रूप बरोबर आहे.’’ या तिच्या गैर-समजाला मी उत्तर देऊन जे स्पष्टीकरण दिले, ते असे- हा शब्द घन:श्याम नसून ‘घनश्याम’ आहे. संस्कृतातून आलेला हा तत्सम (कोणताही बदल न होता मराठीत स्वीकारलेला) शब्द आहे. तसाच, ‘मेघश्याम’ हा शब्दही तत्सम शब्द आहे. या शब्दाचे लेखनही ‘मेघ:श्याम’ असे चुकीचे आढळते. या दोन्ही शब्दांचे लेखन चुकीचे का आढळते? म्हणजे ‘घन’ऐवजी ‘घन:’, ‘मेघ’ऐवजी ‘मेघ:’ असे का लिहिले जाते? न ऐवजी न:, घ ऐवजी घ: असे विसर्गयुक्त अक्षर आपल्याला का लिहावेसे वाटते? या शब्दाचा उच्चार करताना आपण ‘घन’मधील ‘न’ वर आघात देतो, त्याचप्रमाणे ‘मेघ’मधील ‘घ’वर आघात देतो. उच्चारातील आघातामुळे हे शब्द लिहिताना (म्हणजे न व घ यावर आघात दिल्यामुळे) हे शब्द घन:श्याम, मेघ:श्याम असे लिहिले जातात. हा आघात का देतात?  तर संस्कृतमध्ये शब्दातील जोडाक्षरात ‘य’ हे अक्षर शेवटी आल्यास, त्या जोडाक्षराच्या आधी येणाऱ्या अक्षरावर उच्चारताना आघात दिला जातो. जसे-मराठी शब्द उद्या- (द् + या) आणि संस्कृत (तत्सम शब्द) उद्यान- (द् + या). ‘उद्या’ या शब्दाचा उच्चार करताना आधीच्या अक्षरावर (‘उ’वर) आघात देत नाही, पण ‘उद्यान’ या तत्सम शब्दाचा उच्चार करताना संस्कृताप्रमाणे ‘उ’वर आघात दिला जातो. लेखनात काहीच फरक होत नाही.

काही शब्दांचे उच्चार करून पाहा.  तत्सम शब्द-  पुण्य, विद्या, अध्याय, अध्यासन, अध्यक्ष, अध्याहृत, अद्ययावत, आतिथ्य, कौशल्य, अपव्यय, भाग्य, कृत्य, वन्य, मुख्य, अभ्यास, अगम्य. मराठी शब्द- तिच्या, माझ्या, वह्य़ा, वाटय़ाला, आमच्या, भाच्या, भाज्या, पाटय़ावर, अध्यात ना मध्यात, पुण्यात.

– यास्मिन शेख

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pronunciation of the correct marathi word pronunciations in marathi zws

ताज्या बातम्या