-यास्मिन शेख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘त्या लग्नसमारंभाला जाण्यासाठी माझी बहीण तयार झाली. तिने सुंदर साडी घातली होती. माझी आई नऊवारी साडी घालून आमच्याबरोबर येण्यासाठी आधीच तयार झाली होती.’ वरील वाक्यांत ‘घातली’, ‘घालून’ या शब्दांची योजना चुकीची आहे. एखादे शिवलेले वा विणलेले वस्त्र आपण जेव्हा अंगावर चढवतो, तेव्हा ‘घालणे’ या क्रियापदाची रूपे वाक्यांत योजतात. जसे, तो सदरा घालतो, तिने परकर-पोलका (किंवा के) घातला (घातले.), मी पायजमा घालेन. बाबांनी कोट घातला, माझ्या मुलाने मी विणलेला स्वेटर घालून पाहिला. इ. मात्र साडी, लुगडे, धोतर यांच्या संदर्भात ‘नेसणे’ या क्रियापदाची रूपेच वाक्यात योजणे आवश्यक आहे. वस्त्र कमरेपासून खाली निऱ्या करून विशिष्ट पद्धतीने शरीराभोवती गुंडाळणे, यासाठी ‘नेसणे’ या शब्दाची रूपे योग्य आहेत. ‘घालणे’ याचा अर्थ- (आत ठेवणे, ओतणे) परिधान करणे, अंगावर चढविणे, धारण करणे असा आहे. (कंसात दिलेले अर्थ शिवलेल्या वस्त्राच्या संदर्भात नाहीत.) घालणे, नेसणे या शब्दांचे वेगळे अर्थ लक्षात घेऊन वरील वाक्यांतील सदोष शब्दयोजना दूर करता येईल. ही वाक्ये अशी हवीत- ‘तिने सुंदर साडी नेसली होती. माझी आई नऊवारी साडी (लुगडे) नेसून आमच्याबरोबर येण्यासाठी आधीच तयार झाली होती.’

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Proper use of marathi words useful phrases in marathi sentences in marathi zws
First published on: 20-06-2022 at 00:57 IST