– बिपीन भालचंद्र देशमाने
प्रथिनं हा आहारातील महत्त्वाचा घटक आहे. प्रथिनं शरीराच्या वाढीसाठी, झीज भरून निघण्यासाठी उपयुक्त आहेत. परंतु केवळ एवढ्यापुरतंच प्रथिनांचं कार्य मर्यादित आहे असं म्हणणं हे त्यांच्यावर घोर अन्याय करण्यासारखं आहे. कोणताही सजीव प्रथिनांशिवाय जगूच शकत नाही.
प्रथिनांशिवाय सजीवातल्या एकाही रासायनिक क्रियेचे पान हलत नाही. प्रथिनांना विकरं म्हणजे ‘एन्झायम्स’ असं म्हणतात. विकरं हे अतिशय महत्त्वाचे आणि सजीवात विपुल प्रमाणात आढळणारे महारेणू आहेत. रासायनिक क्रियांचा वेग वाढवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम ते करतात. काही प्रथिनं संप्रेरकाचं म्हणजे हॉर्मोनचं काम करतात. उदा. इन्सुलिन रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम करतं. ‘ह्युमन ग्रोथ हॉर्मोन’ हे संप्रेरक शरीराच्या वाढीला हातभार लावतं.
प्रथिनांच्या कामातली विविधता बघा! पक्ष्यांचे पंख बीटा-केरॅटिन नावाच्या प्रथिनाने बनलेले असतात. इथे हे प्रथिनं पक्ष्याला उडायला मदत करतं. आपण हलतो, चालतो, पळतो हे सर्व शरीरातल्या स्नायूंमुळे. स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणामुळे. हे स्नायूच ॲक्टिन आणि मायोसिन नावाच्या प्रथिनांनी तयार होतात. म्हणजे इथे प्रथिनांचं काम म्हणजे हालचाल. आपल्या शरीरात रोगजंतू शिरले की त्यांना हुसकून लावण्यासाठी शरीर ‘प्रतिपिंड’ तयार करतं. या अँटीबॉडीजसुद्धा प्रथिनंच आहेत! आता बोला! इथे प्रथिनांचं काम म्हणजे रोगजंतूंपासून संरक्षण. आणि आता काही प्रथिनांविषयी तुम्हाला मी जे सांगणार आहे, ते ऐकल्यावर तर तुम्हाला धक्काच बसेल. या प्रथिनांमुळे माणूस काही वेळातच मरू शकतो. ही विषारी प्रथिनं म्हणजेच सापाचं विष.
या नमुन्यादाखल दिलेल्या उदाहरणांवरून लक्षात येईल की प्रथिनांच्या कार्यक्षेत्राचा आवाका वैविध्यपूर्ण आणि मोठा आहे! प्रत्येक प्रथिनं हे अमिनो आम्लांची एकमेकांना जोडून बनवलेली साखळीच आहे. ती तोडली तर आपल्याला फक्त अमिनो आम्लंच मिळतात. प्रथिनं २० प्रकारची विविध अमिनो आम्लं जोडून बनतात. सजीवातील सर्व प्रथिनांमध्ये हीच अमिनो आम्लं आलटून-पालटून जोडलेली असतात.
प्रत्येक प्रथिनं एकमेवाद्वितीय असतं. कोणतीही दोन प्रथिनं एकसारखी नसतात. प्रत्येक प्रथिनातली अमिनो आम्लांची संख्या आणि त्या प्रथिनात जोडलेल्या अमिनो आम्लांचा क्रम हा वेगळा असतो. ही अमिनो आम्ल म्हणजे प्रथिनांची रासायनिक मूळाक्षरंच जणू! मराठीतली मूळाक्षरं वापरून अनेक शब्द तयार होतात. शब्द जोडून वाक्य तयार होतं. शब्दांच्या क्रमात अर्थ दडलेला असतो. शब्दांच्या विशिष्ट क्रमाने ओवी तयार होऊ शकते किंवा शिवी! अमिनो आम्लांचा क्रम ठरवतो, ते इन्सुलिन असेल की सापाचं विष की आणखीन काही!
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
