आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. या अनुषंगाने ‘स्फोटक रसायनं’, ‘मद्य आणि मद्यार्क रसायनं’ या विषयावरील लेख या सदरात प्रसिद्ध केले गेले. प्रतिसादावरून हा विषय सर्वसामान्यांना आवडला. पण या विषयांवर आक्षेप घेणाऱ्या वाचकांनी त्यांच्या प्रतिक्रिया निर्भीडपणे मांडल्या. सगळीकडे दहशतवाद चालू असताना स्फोटक रसायनांवर लेख देऊन सर्वसामान्यांना सजग करून त्यात अजून भर घालू नये. दारूचं (मद्याचं) व्यसन ही समाजाला लागलेली कीड आहे. पण हे लेख देण्यामागे कोणताही विषय एक रसायन म्हणून समजून घ्यावा, हा आमचा प्रामाणिक उद्देश होता.
संजीव ठाकर, विनायक रानवडे, चेतन पंडित, विनायक सप्रे, आनंद गिरवलकर यांच्यासारख्या सजग वाचकांनी लेखातील चुका लक्षात आणून दिल्या, तर काहींनी दुरुस्ती सुचवली. काहींनी यापुढे जाऊन लेखकांकडून मार्गदर्शन मिळवलं.
हे लेख संग्रही असावेत या उद्देशानं खूपशा वाचकांनी लेखांची मागणी केली. हे वर्ष संपल्यानंतर रसायनांवरील सर्व लेख लोकसत्तेच्या परवानगीने पुस्तक स्वरूपात प्रकाशित करण्याचा परिषदेचा मानस आहे. या आधीचे कुतूहलचे विषय ‘अभियांत्रिकी जग’ आणि ‘वैद्यक विश्व’ पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाले आहेत.
भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षांचा अभ्यास करणारे गौरव शहाणे आणि इतर अनेक वाचक विद्यार्थ्यांनी या सदराचा खूप उपयोग होत असल्याचं कळवलं. के. एम.की. कॉलेज-खोपोली-रायगड येथून डॉ. शरद पी. पांचगल्ले यांनी रसायनांविषयीचे विद्यार्थाच्या दृष्टीनं उपयुक्त लेख कॉलेजमध्ये भित्तीपत्रक स्वरूपात वापरण्यासाठी परिषदेकडे परवानगी मागितली, तर वेरळा विकास संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. अरुण चव्हाण यांनी प्रिया लागवणकर यांनी लिहिलेल्या ‘मानवी शरीरातील रसायनं’ या विषयावरील लेखांचा वापर ‘आरोग्याची शाळा’ या त्यांच्या संस्थेच्या कार्यक्रमासाठी करण्याची इच्छा व्यक्त केली. आय.आय.टी.तील प्रा.श्याम असोले म्हणाले, ‘यातील काही लेख मी पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वापरतो.’
काही वाचकांनी मजेशीर प्रतिक्रिया नोंदवल्या. प्रशांत गुप्ते यांनी प्रदूषणाला आळा बसावा म्हणून एक पर्याय सुचवला. तो असा, ज्याप्रमाणे जगभरात ढोबळी मिरची (कॅप्सिकम)  वेगवेगळ्या रंगांत उत्पादित केली जाते, त्याच पद्धतीनुसार कापूस विविध रंगात उत्पादित केला, तर कापडाला रंग देण्यासाठी वेगवेगळी रसायनं वापरावी लागणार नाहीत व त्यामुळे काही प्रमाणात प्रदूषण कमी होईल.  
लेख आवडल्याचे अनेक वाचकांनी कळवल्यानं आमच्या टीमचा उत्साह वाढत गेला.
भारतातून तसेच परदेशातूनही अनेक प्रतिसाद आले. यासाठी सर्व वाचक वर्गाचे मन:पूर्वक आभार.
शुभदा वक्टे (मुंबई)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – हॉर्न – ओके- प्लीज!
ओके, हॉर्न प्लीज! बुरी नजर वाले तेरा मूँह काला! आजीचा आर्शिवाद (आशीर्वाद नाही!) यात बरेच नमुने असतात, कधी नाना, कधी आण्णा, कधी आई तर कधी यमू आत्या.. मग इतर काव्य.. भरके चली, अनारकली, संथ वाहते कृष्णामाई पासून तो गगनी उगवला झणी शुक्राचा तारा, धन्य धन्य धन्य तो उत्तरसातारा! असे मजकूर वाचत, त्यावर चिंतन करीत हायवेवरचा प्रवास मजेत होतो.
पिसाऱ्याचा प्रवास बराचसा असाच झाला. कधी नुसतेच मनात घोळणारे विषय, कधी कवी कालिदासांच्या ऋतुसंहारातील शृंगारिक वर्णन, कधी रांगडं भारूड, कधी हळुवार हायकू, लिहिता लिहिता मन विश्रांत होत असे.
परंतु, मनमोराचा पिसारा सीझन दुसरामध्ये शनिवारची पिसं मनाला विशेष आवाहन करीत. मुळात वाचनाच्या शिस्तीमध्ये एखाद्या लेखकाचं एक पुस्तक वाचलं की त्याची मिळतील ती पुस्तकं वाचून काढायची ही सवय घट्ट रुजलेली. त्यात शक्य तो एक लेखक रिपीट करू नका, अशी आग्रही सूचना, त्यामुळे प्रत्येक वेळी नवा लेखक आणि नवं पुस्तक याची जबाबदारी आली.
पूर्वी वाचलेल्या काही अगदी जुन्या पुस्तकांवर लिहावं असं वाटलं. मग ठरवलं की यात नवे लेखक, नवे विषय, नवी हाताळणी शोधण्याची ‘लय भारी’ संधी आहे. त्यामधून सर्वात भावलेली शैली ग्राफिक कादंबऱ्यांची. त्यात बट्रांड रसेलचं लॉजि कॉमिक्स सुचवलं देबू बर्वे या कलाकार चित्रकारानं. प्रेमात पडावं असं पुस्तक! मग त्यासारखी आणखी पुस्तकं. पैकी काफ्का , देकार्तचा समाचार घेतला. युंग आणि वेदान्त तत्त्वज्ञान यांचा समन्वय साधणारं पुस्तक वाचताना आपण वाचन, व्यासंग या बाबतीत बिगरीत आहोत याची जाणीव झाली.
अर्थात, खूप लेखक वंचित राहिले. त्यात आर्थर कोस्लर आणि अ‍ॅलन व्ॉटस्  यांचा उल्लेख करायला हवा. कोस्लर यांचा कॅनव्हास प्रचंड विस्तारित. तर अ‍ॅलन व्ॉटस् तर एखाद्या वाटाडय़ासारखे.वॅट्स यांच्या लेखनापैकी ‘बुद्ध द डिकन्स्ट्रक्शनिस्ट’ म्हणजे तथागतांनी आपले तत्त्वज्ञान मांडताना जुन्या चौकटी आणि प्रस्थापित तत्त्वांचे महाल नि वाडे पाडून टाकले, त्याचा अन्वय, अर्थ आणि तत्त्वविचारांवर झालेला प्रभाव, या पुस्तकाचा पारामर्श घ्यायचा राहून गेलं. यंदाच्या पिसाऱ्यात रंगीत पानांचा अंतर्भाव नसल्याने, कारव्हाज्जिओ या इटालियन चित्रकारावर लिहायचं राहून गेलं. राफाएलच्या प्रेमात पडल्यानं, त्याच्या एखाद्या चित्रावर लिहिलंच.
हे वर्ष गाजवलं ते आठवणीतल्या कवितांमधल्या जुन्या पाठय़पुस्तकातल्या निवडक कवितांनी. या कवितांमुळे ज्येष्ठ नागरिक हरखून गेले, गहिवरले, आपापल्या बालपणात शिरले. कोणाला थेट कराचीतल्या मराठी शाळेची आठवण आली, कोणाला उज्जैन, इंदोरची. कोणाला कविता शिकवणाऱ्या बाईंची, मावशीची, बहिणीची सय येऊन भरून आलं. अशी कित्येक पत्रं आली, त्या पत्रलेखकांचा आभारी आहे..
मराठी माणूस जुन्या कविता, जुनी गाणी आणि ताज्या फुलांवर मनसोक्त प्रेम करतो, हे तर दिसलंच. पण कृष्णकमळाच्या फुलांच्या छायाचित्रांना आवाहन केल्यावर मेलबॉक्स त्या रंगभऱ्या फुलांच्या भाराने कोसळली!
एकुणात मित्र हो, खूप सांगितलं, पण त्यापेक्षा भरपूर सांगायचं राहून गेलं. गाणी, मस्ती, कविता, झाडं, पानं, फुलं यांनी मन भारावून गेलं की या कट्टय़ाची आठवण येते.
या कट्टय़ावर वाचकांनी खूप प्रेम केलं. या सीझनमध्ये विशेष करून दहा-बारा वर्षांपासून ते ३५ वर्षांपर्यंतच्या तरुणांची भरपूर पत्रं मिळाली. सर्वाना धन्यवाद.
शेवटी पुन्हा तोच- ट्रकवर लिहिलेला मजकूर : फिर मिलेंगे, पिसाऱ्याचा कट्टा हे फक्त निमित्त आहे. कुठल्या तरी वळणावर भेटणारच हा मनमोर आणि त्याचा पिसारा.
 डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – .. अंगी बाणवण्याची वेळ
सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया एका मर्यादेपर्यंतच वेग धरू शकली हे खरे आहे;  पण १९ व्या शतकात या प्रक्रियेला अनेकांनी अनेक दिशा, मार्ग, साधने आणि उपाय यांद्वारे गती देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती जोरकसपणे चालू राहिली. पारतंत्र्याच्या काळात संपूर्ण समाजीवनच पणाला लागल्यामुळे वैचारिक घुसळणीला पाठबळही मिळाले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात तो प्रवाह मंदावत गेला. आजची परिस्थिती तर १९ व्या शतकाच्याही आधीची म्हणजे मध्ययुगीन वाटावी अशी आहे. अनेक धर्म, पंथ, जाती-जमाती यांच्यातील सलोख्याला आणि एकात्मतेला पुन्हा वेगवेगळ्या पातळ्यांवर आव्हान मिळू लागले आहे. सामाजिक ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न होत आहेत. तारतम्यपूर्ण सामंजस्याऐवजी पुन्हा  उन्माद, पंथवाद यांनी उचल खाल्ली आहे.
तंत्रज्ञानातील बदलांच्या वेगामुळे सामाजिक स्थैर्य एकाच पातळीवर राहणे दुष्कर झाले आहे. त्यातून सबंध समाजाचेच स्तरीकरण होऊन इतरांबद्दलच्या उदासीनतेला व स्वहिताला प्राधान्य मिळू लागले आहे. वैयक्तिक जीवनाचा स्तर उंचावला जाणे, तो सतत उंचावत राहणे ही मानवी जीवनेच्छेशी जोडली गेलेली अपरिहार्य बाब आहे. पण त्याला सामुदायिकतेची, सर्वागीणतेची, सम्यक-सकारात्मकतेची जोड दिली जायला हवी. अन्यथा तंत्रज्ञानाचे वा निव्वळ माहितीचे लोकशाहीकरण हे थिल्लरीकरणाच्या पातळीवर जाते.
या माऱ्यातून स्वत:ला वाचवायचे असेल आणि समाजालाही आपल्याबरोबर न्यायचा प्रयत्न करायचा असेल तर कठोर आत्मपरीक्षणाची नितांत गरज आहे. त्याशिवाय आपल्या विचारांना लागलेले खग्रास ग्रहण सुटणार नाही. त्यासाठीचा एक पर्याय असतो, सुधारणावादी व्यक्तींच्या विचारांची पुनर्उजळणी करण्याचा.. त्यांच्या विचार-वारशातील काही महत्त्वाचे धडे पुन्हा गिरवून पाहण्याचा. गेले वर्षभर या सदरातून तसा प्रयत्न केला गेला. त्यातील ‘विचार-मौक्तिके’ अंगी बाणवण्याची वेळ आता सुरू झाली आहे.  (समाप्त)