सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

एस्तोनियाच्या प्रमुख भूमिशिवाय बाल्टिक समुद्रात या देशाची लहान लहान २२०० बेटे आहेत. परंतु त्यापैकी केवळ ४० बेटांवरच अगदी तुरळक वस्ती आहे. एस्तोनियन लोक हे मूळचे बाल्टिक फिन्स लोकांचे वंशज होत. एस्तोनियन भाषा फिनिश भाषेशी बरीच मिळतीजुळती आहे. प्राचीन काळात या प्रदेशाचे नाव लिव्होनिया होते, पुढे रोमन इतिहासकार टेसिटस याने त्याच्या पुस्तकात याचा उल्लेख एस्तिति असा केला आणि पुढे हा प्रदेश एस्तोनिया या नावाने ओळखला जाऊ लागला. अकराव्या शतकापर्यंत सध्याचा एस्तोनिया आणि त्या शेजारील उत्तर युरोपियन देशांमधील बहुतेक लोक मूर्तिपूजक आणि बिगर ख्रिस्तीधर्मीय होते. बहुतेक सर्व युरोपात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाल्यावर अगदी अल्प प्रमाणात उशिरा एस्तोनियात ख्रिस्ती धर्म स्वीकारला गेला. आणि या नवख्रिस्तींना दुसरे पारंपरिक धर्म पाळणारे लोक हल्ले करून त्रास देत. इ.स. ११९३ मध्ये पोप सेलेस्टाईनने या उत्तर युरोपातील मूर्तिपूजक लोकांविरुद्ध क्रुसेड म्हणजे धर्मयुद्ध सुरू केले. जर्मनीतील क्रुसेडरच्या योद्धय़ांनी प्रथम लातव्हिया या एस्तोनियाच्या दक्षिणेकडील प्रदेशात तिथल्या जमातींचे धर्मांतर करून प्रथम तिथे आपले बस्तान बसविले. १२१७ मध्ये या जर्मन क्रुसेडर गटाने धर्मप्रसार करून दक्षिणेत आपली सत्ता स्थापन केली तर दोन वर्षांंनी, १२१९ मध्ये उत्तरेतल्या प्रदेशात डेन्मार्कच्या राजाने धर्मप्रसार करीत त्याची डॅनिश सत्ता स्थापन केली. उत्तरेत आणि दक्षिणेत या सत्ता स्थापन होण्यापूर्वी तिथे एस्तोनियन लोकांची छोटी राज्ये होती. क्रुसेडर्सनी त्यांच्यावर हल्ला करून, युद्ध करून त्या प्रदेशांवर कब्जा केला. यामध्ये एस्तोनियातल्या जर्मन प्रदेशात अनेक जर्मन कुटुंबे येऊन स्थायिक झाली, त्यांनी जमिनींवर कब्जा केला. या जर्मन जमीनदारांनी व्यापाराची आणि शासकीय सूत्रे आपल्या हातात ठेवून वर्चस्व मिळविले. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस संपूर्ण एस्तोनियन प्रदेशात मार्टिन लुथर यांच्या प्रभावामुळे लुथेरियन प्रोटेस्टंट पंथाचा प्रसार होऊन रोमन कॅथलिक ऐवजी लोकांनी प्रोटेस्टंट ख्रिस्ती पंथाचा स्विकार केला. या प्रोटेस्टंट पंथाचा प्रसार करण्यात प्रामुख्याने स्वीडिश लोकांनी पुढाकार घेतला. त्यामुळे या स्वीडिश लोकांनी चर्चचे स्वरूप आणि स्थापत्य, धार्मिक साहित्य लॅटीनऐवजी स्थानिक भाषेत लिहिणे असे बदल करीत आपले वर्चस्व स्थापन करायला सुरुवात केली.