नवदेशांचा उदयास्त : चेंगीज खानचे मंगोलिया

एके काळी हे मंगोल साम्राज्य ब्रिटिश साम्राज्यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मोठे साम्राज्य होते.

चेंगीज खानचा नातू कुबलई खान

मंगोलिया हा देश मुळात पशुपालन आणि मेंढपाळी करणाऱ्या भटक्या विमुक्त टोळ्यांचा बनलेला आहे. या टोळ्यांपैकी रोऊरन, गोतुर्क, झिआनबेई वगैरे टोळ्यांनी काही टोळ्या एकत्र करून असे टोळीसंघ बनवून शासकीय व्यवस्था तयार केली. पुढे हे टोळीसंघ मेंढपाळी आणि पशुपालन करतानाच दक्षिणेतल्या चिनी प्रदेशातल्या वस्त्यांवर हल्ले करून लूटमार करीत. तत्कालीन चिनी राज्यकर्त्यांनी चीनच्या उत्तर सीमेवर उंच भिंती बांधून इ.स.पूर्व पाचव्या शतकात मंगोल टोळ्यांना त्यांच्या हद्दीत थांबवून आपले संरक्षण केले. तरीही या भिंतींच्या बाहेरून हे हल्ले सुरूच राहिले. अखेरीस चौदाव्या शतकात चीनच्या तत्कालीन मिंग राजवटीने या सर्व भिंती एकत्र जोडून सध्याची प्रसिद्ध चीनची भिंत बांधून एक सलग २१ हजार कि.मी. लांबीची भिंत उभी केली. तेव्हापासून उत्तरेतल्या मंगोल टोळ्यांचे हे हल्ले थांबले.

मंगोल टोळ्यांचा आपसात काही विशेष संबंध नव्हता. १२०६ साली मात्र एक टोळीप्रमुख तेमुजीन याने प्रयत्नपूर्वक अनेक टोळ्यांमध्ये समन्वय घडवून आणला. या माणसाने चेंगीज खान हे नाव धारण केले. आपल्या एकत्रित मंगोल टोळ्यांकरवी मध्य आणि पूर्व आशियातल्या अनेक प्रदेशांवर आक्रमण करून बराच मोठा प्रदेश त्याने आपल्या अमलाखाली आणून आपले मंगोल साम्राज्य स्थापन केले. अत्यंत क्रौर्यआणि दहशतीमुळे चर्चेत राहिलेल्या गेंजीस खान ऊर्फ चेंगीज खान याने स्थापलेल्या या मंगोल साम्राज्याचा विस्तार पश्चिमेस पोलंडपासून पूर्वेस कोरियापर्यंत विस्तीर्ण प्रदेशात केला. एके काळी हे मंगोल साम्राज्य ब्रिटिश साम्राज्यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मोठे साम्राज्य होते. पुढे चेंगीज खानाचा नातू कुबलई खान याने चीनच्या बऱ्याच मोठय़ा प्रदेशाचा ताबा मिळवून तेथे १२७१ साली युआन राजवंशाच्या सत्तेची स्थापना केली. हे राज्य मंगोलियन साम्राज्याचा एक विभाग समजला जाई. यामुळे कुबलई खान याला चीनचा सम्राट आणि मंगोल साम्राज्याचा खागान म्हणजे सर्वात मोठा खान शासक होण्याचा मान होता. १३६८ मध्ये युआन राजवंशाची सत्ता संपल्यावर मंगोल साम्राज्याचा संकोच होऊन मंगोल शासन दुर्बल झाले आणि त्या प्रदेशातील परिस्थिती पूर्वपदावर आली. चीनच्या मिंग घराण्याच्या सैन्याने मंगोल शासक आणि सैन्याला चिनी प्रदेशातून बाहेर काढले.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rise of genghis khan in mongolia zws

Next Story
इतिहासात आज दिनांक… ८ सप्टेंबर