मुंबईत खडकाळ किनारे हाजी अली, खार दांडा, बँड स्टॅँड आणि कफ परेडच्या काही भागांत दिसतात. कठीण कवचधारी प्राण्यांच्या अधिवासामुळे इथे चालणे सुलभ नसते. कालवांसारख्या प्राण्यांची कवचे पायाला जखमा करू शकतात. पर्यटन किंवा भटकंतीसाठी योग्य नसलेल्या या किनाऱ्यांचा समुद्रशास्त्र अभ्यासासाठी मात्र चांगला उपयोग करून घेता येतो.
खडकाळ किनाऱ्यांवर लाटांचा मारा खूप जास्त असतो. त्यामुळे आधाराला घट्ट चिकटून राहतील असेच जीव तिथे टिकून राहू शकतात. खडकांवरच्या सागरी प्राण्यांना वातावरणाचे तापमान, आद्र्रता, पाण्याचे तापमान, क्षारता, भरतीच्या लाटा, इत्यादींशी सतत सामना करावा लागतो. या अधिवासात शैवाल, समुद्रफुलासारखे आंतरगुही, बार्नकल आणि इतर कवचधारी संधिपाद, मृदुकाय, कंटकीचर्मी तारामासा आणि पॉलिकीट वलयी राहतात. प्रवाळदेखील अशाच ठिकाणी जास्त वाढतात. येथील अन्नसाखळीत प्लवक व शैवाल या उत्पादक-वनस्पती, तर प्राणीप्लवक, कोळंबी, अनेक मृदुकाय हे प्राथमिक भक्षक आढळून येतात. सर्वोच्च भक्षक समुद्रपक्षी असतात. त्यामानाने येथे इतर भक्षकांपासून विशेष त्रास नसतो. परंतु समुद्रफुलासारख्या काही प्रजातींमध्ये त्रासदायक होईल असे रसायन दंशपेशीत तयार करून शुंडकांमार्फत भक्ष्य आणि भक्षक या दोहोंवर वापरण्यात येते. स्वसंरक्षणासाठी अशा प्रकारची अनुकूलने आढळून येतात.
प्रजननासाठी अलैंगिक पद्धती सर्वसाधारण सर्व खडकाळ किनाऱ्यावरील प्रजातींत दिसून येते. तारामासा पुनर्जनन करू शकतो, परंतु ही प्रजननाची पद्धत नाही. शत्रूपासून बचाव करताना शरीराचा एखादा भाग तुटला तर त्याचे पुनर्जनन होते. खडकाळ किनाऱ्यावर खड्डे असलेल्या भागात समुद्राच्या लाटांचे पाणी साठून ‘रॉक पूल’ तयार होतात. त्यात अनेक संधिपाद आढळून येतात. काही मृदुकाय शंख-शिंपले इथे चिकटून राहिलेले असतात. ‘पटेला’ नावाचा कोनासारखा दिसणारा मृदुकाय अशा अधिवासाकरिता विशेष अनुकूलित झालेला दिसतो. भरतीच्या पाण्यात भक्ष्य शोधणे आणि ओहोटीचा कोरडेपणा व प्रखर उन्हापासून रक्षण करण्यासाठी हे प्राणी दगडांच्या फटीत लपतात व कवच घट्ट मिटून त्यात आद्र्रता सांभाळून ठेवतात. बार्नकलसारख्या संधिपाद प्राण्याची चिकटून राहण्याची क्षमता इतकी असते की त्याचा अभ्यास करून गोंदासारखा पदार्थ निर्माण करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.
खडकाळ किनाऱ्यांचा वापर बोटीचे धक्के बांधण्यासाठी केल्याने असे अधिवास नष्ट होऊ शकतात. तसेच मानवी व्यवहारांचा अनिष्ट परिणाम येथे होताना दिसतो.
– डॉ. श्वेता चिटणीस
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org