फुलांना जसा सुवास असतो तसाच सुवास फुले निर्माण करणाऱ्या मातीलासुद्धा असतो, म्हणूनच म्हणतात ना ‘फुलाला सुगंध मातीचा.’ मातीला सुवास असतो याचा शोध १८९१ साली लागला, पण त्यामागचे विज्ञान माहीत करून घेण्यास मात्र १९६५ साल उजाडावे लागले. ग्रेबर (Gerber) आणि लेचेव्हालीयर (Lechevalier) या शास्त्रज्ञांनी या वासाचे  मूळ कारण शोधले. जमिनीमध्ये स्ट्रेप्टोमायसिस हे तंतुमय जिवाणू, उन्हाळय़ात त्यांच्या मृत्यूपूर्वी टरपीन हे सेंद्रिय गंधयुक्त द्रव्य असलेले लाखो बीजाणू (रस्र्१ी२) तयार करतात. शास्त्रज्ञांनी या सुगंधी द्रव्यास जिओस्पीन हे नाव दिले. २०१२ मध्ये शास्त्रज्ञांनी जेव्हा स्ट्रेप्टोमायसिसची जनुकीय साखळी अभ्यासली तेव्हा त्यांना त्यामध्ये जिओस्पीन तयार करणारे जनुक आढळले.

स्ट्रेप्टोमायसिस हे मानवास उपयुक्त असलेले अनेक प्रकारची प्रतिरोधके (Antibiotics) तयार करतात. उद्देश एकच, इतर जिवाणूंना आपल्याजवळ येऊ द्यायचे नाही आणि आलेच  तर नष्ट करायचे. शास्त्रज्ञांनी जेव्हा जिओस्पीनचा अभ्यास केला तेव्हा त्यांना धक्काच बसला, कारण हे नैसर्गिक द्रव्य प्रतिरोधकाच्या विरुद्ध म्हणजे आकर्षणाचेसुद्धा कार्य  करत होते.

पहिल्या पावसामध्ये जेव्हा स्ट्रेप्टोमायसिसचे लाखो बीजाणू जिओस्पीनसह हवेत उधळले जातात तेव्हा कीटक त्या वासाकडे आकर्षिले जातात आणि त्यांच्या पायांना, सोंडेला, पंखांना हे बीजाणू चिकटतात. त्यामुळे परिसरात त्यांचा वेगाने  प्रसार होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सुवासाकडे पिवळा ताप या आजाराचा प्रसार करणारे डाससुद्धा आकर्षित होतात. पावसाळय़ात पसरणारा हा आजार आफ्रिकेमधील अनेक गरीब राष्ट्रांमध्ये मानवी मृत्यूचे मोठे कारण आहे. शास्त्रज्ञांना आढळले की पावसाळय़ात जेव्हा जंगलामध्ये जिओस्पीनचा सुगंध पसरतो तेव्हा हा आजार निर्माण करणाऱ्या डासांची निर्मिती जास्त होते.

बीट या कंदमुळाचे उत्पादन सेंद्रिय जमिनीत जास्त होते. जमिनीमधील स्ट्रेप्टोमायसिस जिवाणू या बीटकंदाच्या बाह्यभागावर मोठय़ा प्रमाणात वाढतात म्हणूनच त्याच्या बाह्य सालीमध्ये जिओस्पीन मोठय़ा प्रमाणावर आढळते. शास्त्रज्ञांनी जेव्हा बिटाच्या साली एका काचेच्या भांडय़ात  ठेवल्या आणि दुसऱ्या काचेच्या भांडय़ात इतर कंदमुळांच्या साली ठेवल्या तेव्हा त्यांना आढळले की सर्व डास बिटाच्या सालीकडे आकर्षित झाले आहेत. तेथे त्यांनी अंडीसुद्धा घातली. ही सर्व सालीमधील जिओस्पीनची किमया होती. मलेरिया, पिवळा आजार हे संसर्गजन्य आजार निर्माण करणाऱ्या डासांना आता आपण या बिटाच्या गुलाबी पिंजऱ्यात सहज बंद करून नष्ट करू शकतो. निसर्ग आणि विज्ञान एकत्र आल्यावर काय चमत्कार होऊ शकतात, याचे हे उत्कृष्ट  उदाहरण आहे.

डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org