या प्रश्नाचं एका शब्दात उत्तर आहे, ‘नाही’. पण आपली इच्छा असो वा नसो, प्लास्टिक कोणत्या ना कोणत्या रूपात स्वयंपाकघरात प्रवेश करतंच. मग त्यातलं कोणतं प्लास्टिक आरोग्याच्या दृष्टीनं त्यातल्या त्यात सुरक्षित आहे आणि ते वापरताना काय खबरदारी घ्यायला हवी हे समजून घेऊया.
प्लास्टिकच्या बाटल्या किंवा डब्यांच्या तळाशी एक त्रिकोण असतो आणि त्यात १ ते ७ पैकी एक अंक दिलेला असतो. याला ‘रेझिन आयडेंटिफिकेशन कोड’ म्हणतात. सर्वसाधारणपणे खाण्यापिण्याच्या वस्तूंचा साठा करण्यासाठी जे प्लास्टिक वापरलं जातं, त्याच्यावर २, ४ आणि ५ हे अंक असतात. हे अंक असलेलं प्लास्टिक त्यातल्या त्यात सुरक्षित समजलं जातं. कारण हे प्लास्टिक त्यात साठवलेल्या अन्नामध्ये रसायनं सोडत नाही.
२ हा अंक असलेल्या प्लास्टिकचा वापर दुधाच्या पिशव्या, बाटल्या आणि पाण्याचे टब यांच्यासारख्या बाबींसाठी केला जातो. हे प्लास्टिक अतिशय जाड आणि टिकाऊ असतं. यातून रसायनं बाहेर पडण्याचा धोका खूप कमी असतो. ४ हा अंक असलेल्या प्लास्टिकचा वापर ब्रेडच्या पिशव्या, गोठवलेल्या अन्नाच्या पिशव्या वगैरेंसाठी केला जातो. हे प्लास्टिक लवचीक असतं आणि आरोग्यासाठी सुरक्षित मानलं जातं.
५ हा अंक असलेल्या प्लास्टिकचा वापर दह्याचे कप, केचअपच्या बाटल्या, औषधांच्या बाटल्या वगैरे बनवण्यासाठी केला जातो. हे प्लास्टिक उष्णता सहन करू शकतं आणि कडक असतं. अन्नासाठी हे सर्वोत्तम मानले जातं. १ हा अंक असलेल्या प्लास्टिकचा वापर पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, कोल्ड्रक्सच्या बाटल्या बनवण्यासाठी केला जातो. हे प्लास्टिक मध्यम सुरक्षित मानलं जातं कारण हे फक्त एकदाच वापरण्यासाठी आहे. जर ही बाटली पुन्हा वापरली किंवा उन्हात अथवा गरम ठिकाणी ठेवली, तर त्यातून ‘अँटीमनी’सारखी आरोग्याला अपायकारक विषारी रसायनं बाहेर पडू शकतात.
ज्या प्लास्टिकवर ३, ६ किंवा ७ अंक लिहिलेला असतो, ते प्लास्टिक घातक समजलं जातं आणि कोणत्याही परिस्थितीत खाण्यापिण्याच्या संदर्भात ते वापरणं सगळ्यांनी टाळलं पाहिजे.
२, ४ आणि ५ हे अंक असलेलं प्लास्टिक सर्वात सुरक्षित समजलं जात असलं, तरी ते वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्लास्टिकच्या डब्यात कधीही गरम अन्न भरू नये किंवा त्यात अन्न ठेवून मायक्रोव्हेवमध्ये ते गरम करू नये. कारण उष्णतेमुळे प्लास्टिकमधून रसायनं बाहेर पडण्याचं प्रमाण वाढतं. जर प्लास्टिकचा डबा जुना झाला असेल किंवा त्याला ओरखडे पडले असतील, तर तो लगेच फेकून दिला पाहिजे कारण अशा परिस्थितीत त्यातून रसायनं लवकर बाहेर पडतात.
