मध्य अमेरिकेतील पूर्व कॅरिबियन समुद्रातील सेंट लुसिया या बेटावर १६७४ साली फ्रेंच राजवटीने त्यांची वसाहत स्थापन केली. सेंट लुसियावर अशा प्रकारे वसाहत स्थापन करणारे फ्रेंच हेच पहिले युरोपियन. त्यांनी या बेटावर उसाची लागवड मोठय़ा प्रमाणात सुरू केली. या बेटावरचे अतिशय आक्रमक असलेल्या कॅरिब या आदिवासींच्या एका राजाबरोबर फ्रेंचांनी काही प्रदेशाबाबत करार केला होता. या बेटावर उसाची मोठी लागवड करण्याचे आकर्षण फ्रेंच आणि ब्रिटिश या दोन्ही राजवटींना होते. त्यामुळे या बेटावरून या दोन्ही राजवटींमध्ये अनेक वेळा संघर्षांची ठिणगी उडत असे. अठराव्या शतकात लुसिया बेटाच्या स्वामित्वासाठी या दोन राजसत्तांमध्ये १४ वेळा युद्धे झाली. या १४ युद्धांमध्ये एकेका सत्तेची सात सात वेळा सरशी झाली. त्यामुळे सात सात वेळा सेंट लुसिया फ्रेंच आणि ब्रिटिशांच्या अमलाखाली गेली, म्हणूनच ग्रीक पुराणकथा ‘हेलन ऑफ ट्राय’ची नायिका हेलन वरून लुसिया बेटालाही ‘हेलन ऑफ द वेस्ट’ म्हणत.

फ्रान्समध्ये चालू असलेल्या राज्यक्रांतीच्या दरम्यान १७९१ मध्ये पॅरिसमधील नेत्यांनी त्यांच्या क्रांतीच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार सेंट लुसियात व्हावा या इराद्याने त्यांचे काही कार्यकर्ते या बेटावर पाठविले. या लोकांनी क्रांतीकार्याचा प्रसार केलाच, परंतु त्यामुळे बेटावरच्या ऊसमळ्यांमधील अनेक गुलामांनी प्रेरित होऊन मळ्यात काम करण्याचे बंद करून दंगेधोपे सुरू केले. पुढे १७९३ मध्ये फ्रान्सने इंग्लंड आणि हॉलंडविरोधी युद्ध सुरू केले. इकडे लुसिया बेटावरच्या गुलामांना शांत करण्यासाठी फ्रान्सने तेथील गुलामगिरी कायद्याने बंद केली. १७९३ मध्ये फ्रान्सने सुरू केलेल्या युद्धात ब्रिटनची सरशी झाली पण ती अल्पकाळाचीच ठरली. पुढच्याच वर्षी

फ्रेंचांनी परत लुसियावर कब्जा केला. अशा प्रकारे आलटून पालटून सेंट लुसियावर अंमल बसविण्याचा प्रकार ब्रिटन आणि फ्रान्समध्ये १८१४ पर्यंत चालला. १८१४ साली नेपोलियनिक युद्धे संपल्यानंतर मात्र सेंट लुसिया बेटावरच्या फ्रेंचांवर निर्णायक हल्ला करून बेटाचे स्वामित्व ब्रिटिशांनी आपल्याकडे राखले. त्या वर्षी सेंट लुसिया बेट हे ब्रिटिश राजवटीची वसाहत बनली.

१८३६ साली ब्रिटिशांनी त्यांच्या या नव्या वसाहतीतून गुलामगिरी कायद्याने बंद केली.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com