scorecardresearch

साम्ययोग : गगनाहूनि वाड..

‘विभूतीयोगा’च्या अध्यायात, समासामध्ये मी कोणाच्या रूपात आहे हे सांगताना ‘द्वंद्व’ समास असे सांगितले आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

‘विभूतीयोगा’च्या अध्यायात, समासामध्ये मी कोणाच्या रूपात आहे हे सांगताना ‘द्वंद्व’ समास असे सांगितले आहे. व्याकरणामध्ये उभयपदप्रधान अशी या समासाची व्याख्या केली आहे. म्हणजे दोन्ही पदे सारखीच महत्त्वाची. उदा. शीत-उष्ण. द्वंद समास का निवडला तर साम्याची परिभाषा मनावर ठसावी म्हणून. ही विनोबांची दृष्टी.

क्षमेचे विवेचन करताना विनोबा तिच्या अनेक पैलूंना स्पर्श करतात. क्षमा म्हणजे ‘द्वंद्व-सहिष्णुता’. यक्षाच्या प्रश्नावरील उत्तरात धर्मराजाने क्षमेचा महत्त्वाचा अर्थ सांगितला. द्वंद्व म्हणजे परस्पर विरोधी गोष्टी. दोन्हीही सहन कराव्या लागतात. अशा द्वंद्वांचा गीतेने सतत निर्देश केला आहे. योगी, संन्यासी, गुणातीत अशा विविधसंदर्भात ही द्वंद्व सहिष्णुता आली आहे. ही संकल्पना अत्यंत व्यापक आहे. ही जी सहन करण्याची शक्ती आहे ती विचार-पोथीमधे अगदी सूत्रमय भाषेत आली आहे. ‘तितिक्षेचा आरंभ दु:खात होतो आणि सुखात तिची कसोटी लागते.’ दु:ख सहन करावे लागते हे आपण नेहमी ऐकतो आणि बोलतो पण सुखही सहन करावे लागते?

गाडी चढावर धावत असेल तर तिला चालवणे हे जिकिरीचे काम असते. उतारावरून चालवताना त्याहून अधिक कष्ट पडतात. जरा दुर्लक्ष झाले की अपघात हमखास होणार. सुख सोसावे लागते याचा हा अर्थ आहे. मग अनुकूल स्थिती कोणती तर चढही नाही आणि उतारही नाही अशी किंवा आहे त्या स्थितीत चित्ताचे समत्व राखणे. थोडक्यात समत्वासाठी क्षमेचा मोठाच आधार आहे.

या शक्तीचा परिचित अर्थ म्हणजे ‘पृथ्वी’. पृथ्वी तरी काय करते आपला भार, आपले ‘अपराध’ सहन करते आणि आपल्याला ‘क्षमा’ही करते. ही सहनशीलता इतकी की पृथ्वीला क्षमा म्हटले जाते. पुन्हा तिला आपल्या या विशेषाची जाणीवही नसते. अजाणता जेव्हा आपण क्षमा करू लागतो तेव्हा तिची शक्ती बनते. हे आपोआप घडत नाही. साधकाला त्यासाठी कसून प्रयत्न करावे लागतात. कोणाचा राग आला आणि आपण त्या व्यक्तीला क्षमा केली तर ती एक चांगली गोष्ट आहे. तथापि तिला शक्ती म्हणता येणार नाही. ते तत्त्व अंगात जिरले पाहिजे. ज्ञानदेवांच्या भाषेत सांगायचे तर, ‘शांति दया क्षमा ऋद्धि हेही पाहता मज उपाधी।’ म्हणजे एखाद्याला दया दाखवणे, क्षमा करणे हे माउलींना यश वाटते आणि ती उपाधी त्यांना नको वाटते.

मानवाने क्षमा-शक्तीची उपासना केली नसती तर त्याचा इतिहास फार खुजा ठरला असता. कोणत्या परिस्थितीत कोणत्या महापुरुषाने या शक्तीची कशी उपासना केली याची गणती करणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. निर्भयतेचा विचार करताना डोळय़ासमोर आकाश येते. इतके विस्तीर्ण असून त्याची भीती वाटत नाही. तसेच पृथ्वीचे आहे. तिच्या ठिकाणी क्षमा शक्ती इतकी ओतप्रोत आहे की प्रसंगी ती गगनालासुद्धा मागे सारते. ही सारी परंपरा विनोबा कवेत घेतात आणि सत्याग्रह, प्रेम आदींसोबत क्षमेची जोडणी. क्षमेचा हा भव्य आविष्कार पुढच्या लेखात.

– अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com 

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Samyayoga instructions grammar interpretation important definition extensive concept ysh

ताज्या बातम्या