सरला बहन : हिमालयकन्या (३)

ब्रिटिशांनी कैद करून अल्मेडा आणि लखनऊच्या तुरुंगात दोन र्वष डांबल.

एक ब्रिटिश महिला असूनही भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होऊन ब्रिटिश सत्तेला विरोध करणाऱ्या गांधीवादी महिला सरला बहन यांना ब्रिटिशांनी कैद करून अल्मेडा आणि लखनऊच्या तुरुंगात दोन र्वष डांबलं. वध्र्याच्या सेवाग्राम आश्रमातून कौसानी येथे गेल्यावर सरला बहन यांनी कुमाऊं पर्वतीय प्रदेशातील महिलांच्या उत्कर्षांसाठी कस्तुरबा महिला उत्कर्ष मंडळातर्फे लक्ष्मी आश्रम सुरू केला. आश्रमासाठी जमीन देणाऱ्या इसमाच्या पत्नीचे नाव आश्रमाला दिलेली ही संस्था सुरू झाली तेव्हा केवळ तीन विद्यार्थिनी होत्या. गांधीजींच्या ‘नयी तालीम’ या शिक्षण प्रयोगाप्रमाणे कार्य करणाऱ्या या संस्थेने आतापर्यंत विमला बहुगुणा, सदन मिश्रा, राधा भट यांसारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यां घडविल्या आहेत.

सरलाबेन उत्तराखंडात राहावयास गेल्यापासून त्या प्रदेशात चाललेल्या वृक्षतोडीने व्यथित होऊन निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करायला त्यांनी सुरुवात केली. हिमालयातील जंगलतोड थांबवून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यासाठी सरला बहन यांनी तिथल्या अनेक तरुणांना प्रेरित केलं. ‘चिपको आंदोलन’ सुरू करण्यात सरला बहन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. या कार्यासाठी पुढे आलेल्या तरुणांमध्ये सुंदरलाल बहुगुणा, चंडी प्रसाद भट, विमला बेन यांचा समावेश आहे.

पुढे सरला बहन यांनी लक्ष्मी आश्रमाची सर्व सूत्रं राधा भट यांच्याकडे सुपूर्द केली. या काळात महत्मा गांधींची हत्या झाली होती आणि त्यानंतर आचार्य विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांच्याकडे गांधीवादी तत्त्वज्ञान आणि कार्याचे नेतृत्व आले. पुढे १९६०च्या दशकात सरला बहन यांनी विनोबांनी बिहारमध्ये सुरू केलेल्या भूदान चळवळीत भाग घेतला, तसेच १९७० च्या सुमारास चंबळमध्ये शरणागती पत्करलेल्या डाकूंच्या कुटुंबांकरिताही त्यांनी कार्य केलं. सरला बहन या सिद्धहस्त लेखिकाही होत्या. त्यांनी पर्यावरण संवर्धन, स्त्रीशक्ती या विषयांवर हिंदी आणि इंग्रजीत लिहिलेली २२ पुस्तकं प्रसिद्ध आहेत. १९७५ साली सरला बेहेन पिथोरगढ जिल्ह्य़ात धरमनगर येथील एका घरात राहावयास गेल्या. तिथेच १९८२ मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्या इच्छेनुसार हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करून दहन करण्यात आलं.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sarla behn