एखाद्या खास प्रसंगी किंवा अगदी दररोज घराबाहेर पडताना बरेचजण अंगावर, कपड्यांवर परफ्युम मारतात. परफ्युम खरेदी करताना अगदी चिकित्सकपणे आवडत्या सुवासाची निवड करतात आणि चारचौघांत आपली छाप पाडतात. पण परफ्युमचा सुगंध काही वेळाने कमी का होत जातो?
आपण अनेकदा परफ्युम आणि अत्तर हे समानार्थी शब्दांसारखे वापरतो. पण अत्तर हे शंभर टक्के नैसर्गिक सुगंधी तेलांपासून बनवलं जातं, तर परफ्युममध्ये नैसर्गिक किंवा कृत्रिम सुगंधी तेल, अल्कोहोल आणि पाण्याचं ठरावीक प्रमाणात बनवलेलं मिश्रण असतं. परफ्युमचा सुवास अल्कोहोलमध्ये, साधारणपणे इथेनॉलमध्ये, विरघळवलेल्या सुगंधी रेणूंमुळे तयार होतो. हे रेणू अस्थिर- सहजपणे हवेत उडून जाणारे असतात. परफ्युम लावल्यानंतर सर्वात आधी अल्कोहोलचं बाष्पीभवन होतं आणि त्याबरोबर सुगंधी रेणू हवेत पसरतात. जेव्हा हे रेणू नाकातील घ्राणग्रंथींपर्यंत पोचतात, तेव्हा आपल्याला परफ्युमचा वास येतो. मात्र याच बाष्पीभवनामुळे परफ्युमचा सुगंध हळूहळू कमी होतो. अर्थात ज्या परफ्युममध्ये सुगंधी तेलाचं प्रमाण जास्त आणि अल्कोहोलचं प्रमाण कमी असतं, त्याचा सुवास दीर्घकाळ दरवळतो.
परफ्युममध्ये वेगवेगळ्या गतीने उडणारे सुगंधी रेणू असतात. हलके आणि लवकर उडणारे ‘टॉप नोट्स’! परफ्युम मारताक्षणी जो पहिला वास येतो, तो याच रेणूंचा! मग थोडे जास्त काळ टिकणारे ‘मिडल किंवा हार्ट नोट्स’! यांना परफ्युमचा आत्मा म्हणतात आणि सर्वात जड व जास्त वेळ टिकणारे ‘बेस नोट्स’! या विविध नोट्समुळे परफ्युमचा सुगंध वेळेनुसार बदलत जातो. तसंच, आपल्या त्वचेचं तापमान आणि प्रकारदेखील महत्त्वाचे असतात. उष्ण किंवा कोरड्या त्वचेवर रेणूंचं बाष्पीभवन जलद होतं, तर तेलकट त्वचा सुगंधी रेणूंना धरून ठेवते. त्यामुळे वास दीर्घकाळ टिकून राहतो. त्यातही त्वचेपेक्षा कपड्यांवर मारलेला परफ्युम जास्त वेळ दरवळतो. दुसरी महत्त्वाची प्रक्रिया- ऑक्सिडेशन. परफ्युम फवारला वा त्याची बाटली उघडली की हवेतील ऑक्सिजन काही सुगंधी संयुगांशी प्रतिक्रिया करून त्यांची रचना बदलतो. म्हणूनच ताजा सिट्रस सुगंध कधी कधी कालांतराने थोडा मंद होतो किंवा वेगळा वाटू लागतो.
प्रकाशदेखील सुगंधाच्या विघटनास कारणीभूत ठरतो. विशेषत: अतिनील किरणं, सुगंधी रेणूंच्या रासायनिक बंधांना तोडू शकतात. या प्रक्रियेला ‘फोटो-डिग्रेडेशन’ म्हणतात. त्यामुळे सुगंध कमी होऊ शकतो किंवा वेगळा वास निर्माण होऊ शकतो. म्हणूनच परफ्युम बहुतेक वेळा जाड, गडद किंवा अपारदर्शक काचेच्या बाटल्यांमध्ये ठेवले जातात. परफ्युमचा सुगंध जास्त काळ टिकवायचा असेल तर बाटली कोरड्या आणि अंधार्या ठिकाणी ठेवावी लागते.
– उमा रानडे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
