पावसाळ्याच्या दिवसांत कपडे सुकवणे ही एक समस्याच असते. बरेच लोक पावसाळ्यात कधी कधी कृत्रिम धाग्याच्या कापडाचे कपडे वापरतात. कारण असे कपडे, सुती कपड्यांपेक्षा लवकर सुकतात. हा फरक सर्वच ऋतूंत दिसून येतो, पण पावसाळ्यात त्याचा परिणाम जास्त जाणवतो.

या दोन्ही कापडाच्या तंतूंमध्ये काही मूलभूत फरक आहेत, जे कापड लवकर किंवा उशिरा सुकण्याला कारणीभूत ठरतात. सुती कपडे कापसापासून तयार करतात. कापसामध्ये सेल्यूलोज हा एक तंतुमय पदार्थ असतो. या तंतुमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तीन घटक असतात. ते एकमेकांना एखाद्या साखळीप्रमाणे चिकटलेले असतात. त्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा एक गट असतो. या गटाला पाण्याशी मैत्री करणं आवडतं. म्हणजे ते पाण्याशी अगदी सहजी बंध तयार करतात. कारण पाण्यातसुद्धा हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असतात. तंतूमधील हायड्रोजन-ऑक्सिजनचा गट पाण्यातल्या हायड्रोजनकडे आकर्षित होतो. हे तंतू हलके, पोकळ, सच्छिद्र, खडबडीत आणि जाड असतात. शिवाय ते जवळजवळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घेतात.

पाण्याच्या रेणूंनाही, दुसर्‍या पदार्थाच्या रेणूंबद्दल खूप आकर्षण असतं. त्यामुळे पाणी तंतूंच्या आत पटकन शिरतं. पाणी तंतूंच्या आतमध्ये गेलं की ते तंतू ओलसर होतात, फुगतात. मग हे पाणी बाहेर पडायला वेळ लागतो. स्पंज किंवा कापूस सच्छिद्र असतात. त्यांच्यावर पाण्याचा थेंब पडला तर पाणी पटकन शोषलं जातं, पण लवकर बाहेर पडू शकत नाही. अगदी तसंच सुती कापडाच्या बाबतीत होतं. त्यामुळेच या आत अडकलेल्या आणि बंधांनी बांधल्या गेलेल्या पाण्याची वाफ होऊन, ती कपड्याबाहेर पडायला खूप वेळ लागतो.

मात्र तसं काही कृत्रिम तंतूच्या बाबतीत होत नाही. नायलॉन, पॉलिस्टर हे कृत्रिम तंतू आहेत. हे तंतू खनिज पदार्थ, नैसर्गिक वायू अशा पेट्रोरसायनांपासून तयार करतात. त्यांच्यात कार्बन-ऑक्सिजन आणि कार्बन-हायड्रोजनचे बंध मोठ्या प्रमाणात असतात. पाणी तंतूच्या आत खेचून घेण्याचं काम कार्बन-ऑक्सिजनचे बंध किंवा कार्बन-हायड्रोजनचे बंध करत नाहीत. त्यामुळे कृत्रिम तंतूंची, पाण्याशी मैत्री होत नाही. याउलट, पाण्याला लांबच ठेवण्याचा त्यांचा गुणधर्म असतो. हे तंतू सच्छिद्र नसतात, तंतूमध्ये लहान पोकळ्याही नसतात, शिवाय त्यांचा पृष्ठभागही खूप गुळगुळीत असतो आणि हे तंतू हलकेही असतात. साहजिकच तंतूंमध्ये पाणी शोषलं जात नाही. त्यामुळे पाणी कपड्याच्या पृष्ठभागावरच राहतं. हवेच्या संपर्कात आल्यावर, या पृष्ठभागावरच्या पाण्याचं बाष्पीभवन पटकन होतं, म्हणून कृत्रिम कपडे लवकर सुकतात. पावसाळ्यात असे कपडे वापरणं सोयीचं ठरतं.