– सुचेता भिडे, मराठी विज्ञान परिषद

‘पाण्या तुझा रंग कसा? ज्याला जसा हवा तसा’, ही गदिमांच्या एका गीतातली ओळ आहे. पाण्यात लाल किंवा हिरवा रंग घातला तर पाणी लाल किंवा हिरवं दिसतं. तरणतलावाच्या म्हणजेच पोहण्याच्या तलावाच्या पाण्यात निळा रंग टाकत असतील, म्हणून ते पाणी निळं दिसत असेल का? तसं असेल तर ते पाणी आपल्या ओंजळीत किंवा वाटीत घेतलं तर निळं दिसलं पाहिजे; पण तसं ते दिसत नाही. मग पोहण्याच्या तलावातलं पाणी निळं का दिसतं?

तलावातलं पाणी निळं दिसणं, हे प्रकाशाच्या काही विशेष गुणधर्मामुळे घडतं. पांढरा प्रकाश हा मुख्यत: सात रंगांपासून तयार झालेला आहे. तलावात प्रकाश शिरला की तो पाण्यातून प्रवास करत तळाशी जातो. प्रकाश तळाशी जात असतानाच, प्रकाशऊर्जेतले लाल, पिवळा, नारिंगी हे रंग पाण्यात शोषले जातात. मग हे रंग पाण्यातच राहतात; याउलट निळ्या रंगाचा प्रकाश पाण्यात सगळीकडे विखुरला जातो. हा निळ्या रंगाचा प्रकाश आपल्या डोळ्यांना जाणवतो, म्हणून पोहण्याच्याच कशाला, बर्‍याच तलावातलं पाणी आपल्याला निळं भासतं. त्यातच पोहण्याच्या तलावाच्या तळाशी बहुधा निळ्या रंगाच्या फरशा लावलेल्या असतात. त्यामुळे हा परिणाम जास्त जाणवतो.

पोहण्याचा तलाव साधारणपणे एक ते दोन मीटर खोल असतो. जसजसा प्रकाश जास्त खोल जातो तसतसा लाल, पिवळा हे रंग जास्त प्रमाणात शोषले जातात. निळा रंग जास्त पसरतो, म्हणजेच विखुरला जातो. पोहण्याच्या तलावातल्या पाण्याची स्वच्छता मोठ्या प्रमाणात राखली जाते. त्यामुळे या पाण्यात मातीचे लहान-मोठे कण नसतात. पाणी नितळ आणि स्वच्छ असल्यामुळे प्रकाशातला निळा रंग पसरतो.

खोलीनुसार निळ्या रंगाच्या छटा गडद होतात, म्हणून खोल तलावातला पाण्याचा गडद निळा रंग खुलून दिसतो. पोहण्याच्या तलावातलं पाणी ‘वाटी’त घेतलं तर ते निळं दिसत नाही, कारण प्रकाशातल्या लाल रंगाच्या छटा, पाण्यात शोषल्या जाण्यासाठी किंवा निळा रंग पसरण्यासाठी लागणार्‍या पाण्याची खोली वाटीतल्या पाण्याला नसते.

नदी, नैसर्गिक तलाव, धरणातलं पाणीसुद्धा निळसर दिसतं; पण पोहण्याच्या तलावातल्या निळ्या रंगाप्रमाणे हे पाणी दिसत नाही. या पाण्याच्या साठ्यांमध्ये मातीचे कण जास्त असतात. त्यामुळे निळा रंग सगळीकडे सारख्या प्रमाणात विखुरणं शक्य नसतं. तो व्यवस्थित विखुरला जात नसल्यामुळे पाणी थोडंसं तपकिरी दिसतं. शिवाय अशा नैसर्गिक पाण्याच्या साठ्यात काही पाणवनस्पती असतात. त्यामुळे पाण्यावर हिरवट तपकिरी झाक दिसते. म्हणूनच तर पोहण्याच्या तलावाच्या पाण्याचा रंग कसा, जसा आपल्याला हवा तसा… निळा!