मकरंद भोंसले, मराठी विज्ञान परिषद
आपण आकाशाकडे पाहिलं की आपल्याला ग्रह आणि तारे दिसतात. त्यातले तारे लुकलुकतात पण ग्रह मात्र स्थिर असतात. तुमच्या हेही लक्षात आलं असेल की आपल्या डोक्यावरच्या तार्‍यांच्या तुलनेत क्षितिजाजवळचे तारे जास्त चमकताना किंवा लुकलुकताना दिसतात. कधीकधी हे तारे लुकलुकताना त्यांचे रंगही बदलताना आपल्याला दिसतात. यामागे पृथ्वीचं वातावरण आणि प्रकाशाचं अपवर्तन ही मुख्य कारणं आहेत. या शास्त्रीय प्रक्रियेला ‘स्टेलर सिंटिलेशन’ असं म्हणतात.

तारे हे पृथ्वीपासून खूप दूर असतात आणि त्यांचा प्रकाश आपल्यापर्यंत येताना पृथ्वीच्या वातावरणातून प्रवास करतो. जेव्हा आपण आपल्या डोक्यावरचा एखादा तारा पाहतो तेव्हा त्याचा प्रकाश हा वातावरणाच्या तुलनेने पातळ थरातून प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचतो. पण आपण जर क्षितीजाजवळचा तारा पाहत असू, तर मात्र त्या प्रकाशाला वातावरणाच्या अत्यंत जाड आणि विस्तीर्ण थरातून प्रवास करावा लागतो. डोक्यावरच्या तार्‍याच्या तुलनेत हा प्रवास १० ते २० पटींनी जास्त असतो. या मोठ्या प्रवासात प्रकाशाचा मार्ग तुलनेने जास्त विचलित होतो. पण तो विचलित का होतो?

पृथ्वीच्या वातावरणात हवेचे अनेक थर असतात. ही हवा कधीच स्थिर नसते. पृथ्वीचं वातावरण सतत हलत असतं. गरम हवा वर जाते, थंड हवा खाली येते. त्यामुळे या हवेच्या थरांचं तापमान आणि घनता सतत बदलत असते. क्षितिजाजवळ असलेल्या तार्‍याच्या प्रकाशाला आपल्यापर्यंत पोचायला हवेच्या अशा अनेक थरांना पार करावं लागतं. ही हवा जेवढी जास्त हालचाल करेल, तेवढा हा प्रकाश जास्त वाकतो.

अशा तार्‍याचा प्रकाश जेव्हा वेगवेगळ्या घनतेच्या हवेतून जातो, तेव्हा तो सतत आपली दिशा बदलतो. त्यामुळे आपल्या डोळ्यांतली तार्‍याची प्रतिमा कधी थोडी डावीकडे तर कधी उजवीकडे सरकते. प्रकाशाची तीव्रताही सतत कमी-जास्त झाल्यासारखी वाटते, त्यामुळे आपल्याला तारा चमकताना किंवा लुकलुकताना दिसतो.

क्षितिजाजवळ असलेल्या तार्‍याच्या प्रकाशाला त्याच्या प्रवासात वेगवेगळ्या तापमानाच्या हवेच्या थरांतून जावं लागतं. त्यामुळे तार्‍याच्या पांढर्‍या प्रकाशाचे वेगवेगळ्या रंगांत विभाजन होतं. म्हणून कधीकधी क्षितिजाजवळचे तारे लुकलुकताना लाल, निळा किंवा हिरवा असे रंग बदलताना दिसतात.
ग्रह सहसा तार्‍यांसारखे लुकलुकत नाहीत, कारण ते तार्‍यांच्या तुलनेत आपल्या अधिक जवळ आहेत. अजून एक मुद्दा म्हणजे तार्‍यांचा प्रकाश एका बिंदूतून आल्यासारखा येतो, परंतु ग्रहांचा प्रकाश मात्र एका बिंदूतून न येता अनेक समांतर किरणांतून येतो. त्यामुळे त्यातून निघणार्‍या किरणांनी त्यांचा मार्ग बदलला तरी त्यांचा प्रभाव एकमेकांना रद्द करतो. म्हणून आपण म्हणतो, तारे लुकलुकतात पण ग्रह स्थिर असतात.