शिंक येण्यामुळे नाक स्वच्छ होतं. तसंच शिंक ही एक संरक्षक क्रियादेखील आहे. कारण शरीराला अनावश्यक आणि हानिकारक बाह्यकण शरीरात शिरण्यापासून रोखण्याचं काम शिंक करत असते.शिंक ही शरीराची आपल्या नकळत घडणारी एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे. नाकामध्ये त्रासदायक बाह्यकण जमा झाले की तिथल्या संवेदनशील नसांमार्फत मेंदूकडे संदेश जातो. यावर प्रतिक्रिया म्हणून मेंदूकडून शरीरातील वेगवेगळ्या स्नायू आणि फुप्फुसांना संदेश जातो. त्यामुळे छाती आणि पोटाचे स्नायू आकुंचन पावतात आणि फुप्फुसांतून अत्यंत वेगाने आणि जोराने हवा सोडली जाते. ही हवा नाका-तोंडावाटे बाहेर पडते आणि नाकात जमा झालेले कण स्फोटकपणे बाहेर फेकले जातात आणि आपण शिंकतो.
सर्वसाधारणपणे धूळ, धूर, परागकण यासारखे ॲलर्जी वाढवणारे घटक, विषाणू वा जिवाणूंमुळे होणारा जंतुसंसर्ग, उग्र वास, पाळीव प्राण्यांचे केस यांसारख्या गोष्टींमुळे आपल्याला शिंक येते.
काही लोकांना अंधारातून अचानक उन्हात गेल्यावर शिंक येते. हा एक आनुवंशिक गुणधर्म आहे. अंधारातून प्रखर प्रकाशात गेल्यावर दृष्टीशी संबंधित मज्जातंतू उत्तेजित होतो. या मज्जातंतूजवळच ठरावीक परिस्थितीत सुरक्षिततेसाठी ‘शिंक निर्माण करणारा’ मज्जातंतू असतो. अचानक उद्दीपित झालेल्या दृष्टीच्या मज्जातंतूची ‘उद्दिपितता’ या शिंक निर्माण करणार्या मज्जातंतूलाही चुकून उद्दीपित करते आणि त्यातून शिंक येण्याची प्रतिक्षिप्त क्रिया होते. तापमान अचानक कमी झाल्यास किंवा गार वार्याचा झोत लागल्यास नाकातील रक्तवाहिन्या अचानकपणे आकुंचन आणि प्रसरण पावतात. यामुळे नाकातील म्युकस मेम्ब्रेन म्हणजेच श्लेष्मल त्वचेला त्रास होतो आणि शिंक येते.
आपल्याला जर विषाणूजन्य आजारामुळे म्हणजेच व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी पडसं झालं असेल तर त्यामध्ये येणार्या शिंका त्या आजाराचा प्रसार हवेमार्फत करू शकतात. शिंकेतून बाहेर सोडल्या गेलेल्या हवेचा वेग ताशी ६० ते ८० किलोमीटर इतका असू शकतो आणि एका शिंकेतून, श्वसननलिकेतून अंदाजे ४० हजार थेंब बाहेर फेकले जातात. आजारी व्यक्ती शिंकली तर तिच्या आजूबाजूला सुमारे सहा ते आठ फुटांपर्यंतच्या परिसरापर्यंत जंतूंचा हवेतून प्रसार होऊ शकतो. कोविडच्या साथीच्या काळात हा आजार वेगाने पसरण्याचं एक कारण शिंकेतून होणारा जंतूप्रसार हेदेखील होतं. म्हणूनच त्या वेळी आजारी व्यक्तीने मास्क वापरणं सक्तीचं होतं. आता कोविडची साथ जरी नसली, तरीही आपल्यामुळे इतरांना संसर्गजन्य आजार होऊ नयेत म्हणून शिंक आल्यास नाका-तोंडाजवळ रुमाल धरणं, नाका-तोंडाजवळ कोपराचा आतील भाग नेऊन ते झाकणं किंवा मास्क वापरणं कधीही चांगलं! कारण आपण शिंक येणं जरी टाळू शकलो नाही तरी आजाराचा प्रसार नक्कीच टाळू शकतो!
– डॉ. राजेश पुसाळकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : pkachare@gmail.com
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
