आपल्याला कधी कधी चंद्राभोवती एक तेजस्वी वर्तुळ दिसतं किंवा प्रकाशाचं कडं दिसतं त्याला ‘खळं’ म्हणतात. खळं सूर्याभोवतीही पडतं. ही एक प्रकाशाच्या वक्रीभवनामुळे घडणारी घटना आहे. यामागचं कारण माहीत नसल्यामुळे विविध संस्कृतींमध्ये त्याविषयी काही समज-गैरसमज आणि अंधश्रद्धा निर्माण झाल्या. कोणी या खळ्याला अशुभ समजतं तर काही देशांत हा खराब हवामानाचा संकेत समजला जातो. चंद्राभोवती खळं दिसण्यासाठी चंद्र एका विशिष्ट प्रकारच्या ढगांच्या थराआड असावा लागतो.

ढगांचं वर्गीकरण त्यांच्या जमिनीपासून किंवा समुद्रसपाटीपासूनच्या उंचीवरून केलं जातं. शून्य ते दोन किलोमीटर उंचीवरच्या ढगांना ‘निम्नस्तरीय’ किंवा कमी उंचीवरचे ढग म्हणून ओळखतात. हे ढग पूर्णत: पाण्याच्या थेंबांपासून बनलेले असतात आणि त्यांच्यामधून सूर्यबिंब किंवा चंद्रबिंब अजिबात दिसत नाही, फक्त त्या दिशेने प्रकाश येताना दिसतो. जमिनीपासून दोन ते सहा किलोमीटर उंचीवरचे ढग ‘मध्यमस्तरीय’ किंवा मध्यम उंचीवरचे ढग म्हणून ओळखले जातात. हे पाण्याचे थेंब आणि बर्फाचे स्फटिक यांच्या मिश्रणाचे बनलेले असतात. सूर्य आणि चंद्रबिंब या ढगांमधून दिसतात, पण त्यांची कड अस्पष्ट दिसते.

सहा किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवरचे ढग हे ‘उच्चस्तरीय’ किंवा सर्वाधिक उंचीवरचे ढग म्हणून ओळखले जातात. यांना इंग्लिशमध्ये ‘सिरस’ आणि मराठीत ‘तंतुमेघ’ म्हणतात. हे ढग पूर्णपणे बर्फाच्या स्फटिकांपासून तयार झालेले असतात. या ढगांमधून सूर्य आणि चंद्राची बिंबं स्पष्ट दिसतात आणि त्यांची बाह्यरेषा म्हणजे कडसुद्धा स्पष्ट दिसते. सूर्य-चंद्राभोवती खळं दिसतं ते याच ढगांमधून. खळं दिसण्यामागे प्रकाशाचं बर्फाच्या स्फटिकांमधून होणारं वक्रीभवन कारणीभूत असतं. या स्फटिकांच्या आकारामुळे किरणांचं २२ अंशांतून वक्रीभवन होऊन ते पृथ्वीवर आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे आपल्याला चंद्राभोवती २२ अंशांच्या कोनीय त्रिज्येचं जे वर्तुळ दिसतं ते चंद्राचं खळं.  

या खळ्याचा आणि हवामानाचा संबंध आहे. जेव्हा उंचीवर जोराचे वारे वाहतात तेव्हा हे तंतुमेघ तयार होतात. असे वारे वादळाच्या आसपास वाहतात. यावरून चंद्राच्या खळ्याला खराब हवामानाची पूर्वसूचना समजतात. चंद्राचं खळं आणि इंद्रधनुष्य या किरणांच्या वक्रीभवनामुळे घडणार्‍या घटना असल्या, तरी त्यात ठळक फरक आहेत. चंद्र व खळं निरीक्षकाच्या समोर असतात, तर निरीक्षकाला समोर इंद्रधनुष्य दिसत असताना सूर्य त्याच्या पाठीशी असतो. खळं प्रकाशाच्या वक्रीभवनामुळे पडतं तर इंद्रधनुष्य हे सूर्यकिरणांच्या ‘संपूर्ण आंतरिक परावर्तन’ आणि पृथक्करणामुळे पडतं. हा प्रकाशाच्या वक्रीभवनाचा एक विशिष्ट प्रकार आहे आणि त्यात वक्रीभवनाचा कोन ४० ते ४२ अंशांचा असतो.

– सुनील सुळे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org