झोप हा आपल्या दैनंदिन जीवनशैलीतील एक महत्त्वाचा घटक आहे. व्यक्तीनुसार झोपेचे वेगवेगळे प्रकार असू शकतात. काहींना गाढ झोप लागते, तर काहींची सावध झोप असते. काहींना दहा-दहा तास झोपलं तरी झोप अपुरी वाटते, तर काहींना तीन-चार तास झोपलं तरी पुरेसं असतं. झोप ही एक नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे. खूप काळ झोप न लागणं मात्र अनैसर्गिक आहे. पण मुळात आपण का झोपतो आणि जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीरात काय काय घडत असतं?

झोप ही शरीराने निर्माण केलेली सक्रिय बेशुद्धावस्था आहे. आपण झोपेत असताना मेंदूला विश्रांती मिळते. मेंदू या काळात दृष्टी, श्रवण, स्पर्श यासारख्या बाह्य उत्तेजकांना कमी प्रतिसाद देतो. झोप येणं आणि ती लागणं हे शरीरांतर्गत असलेल्या जैविक घड्याळामुळे घडतं. हे बाहेर अंधार पडण्यावर अवलंबून असतं. अंधार पडला की मेंदू मेलॅटोनिन नावाचं संप्रेरक रक्तात सोडतो. त्यामुळे शरीराची कार्य मंदावतात.

झोपेमध्ये आपल्या हृदयाची गती कमी होते, श्वासाचा वेग मंदावतो आणि रक्तदाबही कमी होतो. यामुळे हृदय आणि फुप्फुसांना विश्रांती मिळते. झोपेच्या काळात दिवसभरात हालचालीमुळे नादुरुस्त झालेले स्नायू आणि पेशी यांची दुरुस्ती होते. चयापचयामुळे दिवसभरात मेंदूत जमा झालेले टाकाऊ पदार्थ झोपेच्या काळात मेंदूतून बाहेर पाठवले जातात. तसंच याच काळात मेंदूत स्मरणशक्ती सुधारण्याची प्रक्रिया घडते. झोपेमुळे दिवसभरात अनुभवलेल्या नकारात्मक भावनांची तीव्रता कमी होते. झोप ही शरीर आणि मनासाठीही देखभाल आणि दुरुस्तीची संधी असते. त्यामुळेच पुरेशी झोप मिळाल्यावर आपल्याला ताजंतवानं वाटतं. लहान मुलांच्या शारीरिक वाढीसाठी आवश्यक अशा संप्रेरकाची निर्मिती झोपेच्या काळात होते. म्हणूनच लहान मुलं जास्त काळ झोपतात आणि वाढत्या वयातदेखील मुलांची पुरेशी वाढ होण्याच्या दृष्टीने व्यवस्थित झोप होणं महत्त्वाचे आहे.

आपल्या झोपेचे हलकी झोप, गाढ झोप आणि डोळ्यांच्या जलद हालचालींची झोप म्हणजे ‘आरईएम झोप’ असे प्रकार आहेत. रात्रभर त्यांची पुनरावृत्ती होत असते. साधारणपणे प्रत्येक झोपेच्या प्रकाराचा कालावधी ९० मिनिटांचा असतो. डोळ्यांच्या जलद हालचालींच्या झोपेच्या काळात आपल्याला स्वप्नं पडतात.

थोडक्यात झोप म्हणजे शरीरासाठी मोबाइल फोन चार्ज करण्यासारखं आहे. फोन पूर्ण चार्ज केला असेल तर तो नीट चालतो. तसंच आपली रात्रीची झोप पूर्ण झाली असेल तर आपण उद्याच्या आव्हानांचा सामना करायला तयार होतो. पुरेशी झोप न झाल्यामुळे मात्र एकाग्रता कमी होणं, स्मरणशक्तीवर परिणाम होणं, मुलांमध्ये वर्तणूक समस्या उद्भवणं असे त्रास होऊ शकतात.

– डॉ. राजेश पुसाळकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org