जेव्हा कोणतेही दोन पृष्ठभाग एकमेकांच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यांच्यात नेहमीच घर्षण होत असतं. त्यातही त्यातला एक किंवा दोन्हीही पृष्ठभाग जर गतिशील असतील तर त्या वेळी हे घर्षणबल नेहमीच गतीच्या विरुद्ध दिशेने कार्यरत असतं.
एखादी वस्तू जेव्हा कोणत्याही पृष्ठभागावर गतिमान होत असते, तेव्हा तिच्या गतीवर घर्षणाचा फार मोठा परिणाम होत असतो. कारण पृष्ठभाग ओबडधोबड असेल तर घर्षणबल जास्त आणि परिणामी गतीला विरोध जास्त! याउलट पृष्ठभाग जेवढा गुळगुळीत तेवढं कमी घर्षण, कमी विरोध आणि म्हणून वस्तूची गती जास्त!
घर्षणामुळे चालताना पायांना जमिनीवर पकड मिळवता येते. जेवढं घर्षण जास्त तेवढा चालण्याचा वेग कमी! कधीही खडबडीत पृष्ठभागावर चालणं हे गुळगुळीत पृष्ठभागावर चालण्यापेक्षा सोपं असतं. गुळगुळीत पृष्ठभागावर फारसं घर्षण नसल्यामुळे वेग वाढून, घसरून पडण्याची शक्यता असते. म्हणून तर केळीच्या गुळगुळीत सालीवरून पाय सरकून आपण सपशेल आडवे होतो.
कोणत्याही खेळात पायांची जमिनीवरची पकड महत्त्वाची असते. मात्र आपण पाहतो की ही पकड पुरवणारे खेळाडूंचे बूट खेळानुसार बदलतात. विशेषत: त्या बुटांचे तळवे!
बुटाचे तळवे हे खेळाच्या आवश्यकतेनुसार घर्षण पुरवण्यासाठी तयार केलेले असतात. क्रिकेट आणि फुटबॉल यांसारखे खेळ थोडाफार पाऊस आला तरी चालू राहतात. अशा वेळेस निसरड्या झालेल्या मैदानावर पायांची पकड सहजी जाऊ नये यासाठी खेळाडूंच्या बुटांच्या तळव्यांना खिळे किंवा छोटे उंचवटे असतात. मात्र टेबल टेनिस, बास्केटबॉल, बॅडमिंटन यांसारख्या खेळांत खेळाडूंना सपाट आणि तुलनेने गुळगुळीत पृष्ठभागावर चपळ हालचाली कराव्या लागतात. अशा वेळेस खेळाडूंना कमी वेळात करावे लागणारे दिशाबदल आणि वेगातले चढउतार नियंत्रित करण्यासाठी जास्त घर्षणाची गरज असते. म्हणून या खेळांत वापरल्या जाणार्या बुटांचे तळवे सपाट आणि रबरापासून बनवलेले असतात. एखादा खोडरबर काचेसारख्या एखाद्या गुळगुळीत पृष्ठभागावर फिरवून पाहिल्यास आपल्या हे लक्षात येईल.
धावपटूंना मात्र इतकं घर्षण उपद्रवी ठरतं. त्यांना जरी वेगानं धावावं लागत असलं तरी त्यांना आपल्या दिशेत पटापट बदल करावा लागत नाही. त्यामुळे त्यांना वेगाशी तडजोड न करता धावण्याच्या ट्रॅकवरची पकडही सुटणार नाही इतपतच घर्षणाची गरज असते. म्हणून धावपटूंच्या बुटांचे तळवे नक्षीदार रबराचे असतात. थोडक्यात, जिथे जास्त वेग हवा असतो तिथे जमिनीबरोबर कमी घर्षण करणारे बुटांचे तळवे तर जिथे वेग कमी आणि पकड अधिक हवी असेल तिथे खडबडीत म्हणजेच जास्त घर्षण करणारे बुटांचे तळवे वापरणं गरजेचं ठरतं!
– सुमेध सावंत , मराठी विज्ञान परिषद
