आपल्या शरीराला अन्नाइतकीच पाण्याचीही गरज असते. शरीरातील जवळजवळ प्रत्येक क्रिया पाण्यावर अवलंबून असते. म्हणूनच शरीराला पाण्याची कमतरता जाणवली की आपल्याला तहान लागते. तहान ही केवळ पाणी पिण्याची इच्छा नसून शरीरानं दिलेला एक महत्त्वाचा इशारा असतो.
मानवी शरीरात सुमारे ६० टक्के पाणी असतं. हे पाणी रक्त, पेशी, स्नायू आणि विविध अवयवांमध्ये असतं. श्वासोच्छवास, घाम, लघवी आणि इतर प्रक्रियांमुळे शरीरातील पाणी सतत कमी होत असतं. ही शरीरातली पाण्याची पातळी ठरावीक प्रमाणापेक्षा कमी झाली की मेंदू शरीराला संदेश देतो आणि आपल्याला तहान लागल्याची जाणीव होते.
आपल्या मेंदूमध्ये ‘हायपोथॅलॅमस’ नावाचा भाग असतो. हा भाग शरीरातील पाण्याचं प्रमाण सतत तपासत असतो. रक्तातील पाण्याचं प्रमाण कमी झालं किंवा मिठाचं प्रमाण वाढलं की हा भाग सक्रिय होतो. मग तो आपल्याला पाणी पिण्याची सूचना देतो. म्हणूनच जास्त खारट पदार्थ खाल्ले की तहान अधिक लागते.
मीठ किंवा मसालेदार पदार्थ खाल्ले की ते शरीरातील पाणी शोषून घेतात, त्यामुळे आपल्याला तहान लागते. भरपूर व्यायाम केल्याने किंवा उष्ण हवामानात असताना शरीरातील पाणी आटतं आणि आपल्याला तहान लागते. मधुमेहींच्या बाबतीत शरीरातील अतिरिक्त साखर बाहेर टाकून देण्यासाठी मूत्रपिंडं जास्त प्रमाणात लघवी तयार करतात. त्यामुळे मधुमेही व्यक्तीला वारंवार मूत्रविसर्जनास जावं लागतं आणि परिणामी शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं व त्याला सारखी तहान लागते.
बिअर किंवा इतर मद्यांचं प्राशन केल्यामुळे मूत्रविसर्जनास प्रतिबंध करणार्या संप्रेरकांचा प्रभाव कमी होतो. ‘अँटी डाययुरेटिक हॉर्मोन’ हे संप्रेरक मेंदूतील पिट्युटरी ग्रंथीत स्रवतं. याला ‘व्हॅसोप्रेसीन’सुद्धा म्हणतात. या संप्रेरकाचा प्रभाव कमी होऊन मूत्रविसर्जन वाढतं. परिणामी शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन तहान लागते. खास करून बिअरमध्ये पाणी खूप प्रमाणात असतं, त्यामुळेही मूत्राशय लवकर भरून जातं. जुलाब किंवा उलट्यांमुळेही शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन तहान लागते. गर्भवतींना जास्त तहान लागते कारण पोटातील गर्भाच्या वाढीसाठी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता असते.
तहान लागल्यावर पाणी पिणं सर्वोत्तम. कारण ते सहज उपलब्ध असतं आणि त्यात उष्मांक नसतात. उलट्या-जुलाबांमुळे किंवा व्यायामामुळे तहान लागली असेल तर नारळाच्या पाण्यासारखं इलेक्ट्रोलाइटयुक्त द्रव पिणं योग्य आहे. साखरयुक्त द्रव पिऊ नये, कारण त्यामुळे शरीराची निर्जलता वाढते. दूध, सूप, फळांचे किंवा भाज्यांचे रससुद्धा निर्जलतेवर चांगला उपाय आहेत. ‘ओआरएस’ म्हणजे ‘ओरल डिहायड्रेशन सोल्युशन’ हे शरीराला आवश्यक क्षार असलेलं पाणीसुद्धा उपयुक्त आहे.
हेमंत साने
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
