विषुववृत्तापासून उत्तरेला कर्कवृत्तापर्यंत आणि दक्षिणेला मकरवृत्तापर्यंतच्या समुद्रांमध्ये चक्रीवादळांचा धोका संभवतो. या वादळांमध्ये सापडून अनेक जहाजे बुडाली आहेत आणि हजारो दर्यावर्दी मृत्युमुखी पडले आहेत. यामुळे समुद्रावर प्रवास करीत असताना जोराचे वारे वाहू लागले, की प्रत्येक नाविकाच्या मनात ‘आसपास कुठे वादळ तयार होतंय का’, ‘ते नक्की कुठे आहे’, ‘आपण वादळापासून दूर चाललो आहोत की त्याच्या दिशेने?’ असे अनेक प्रश्न उभे राहतात आणि त्यांची उत्तरे शोधण्यात चूक झाली तर प्राणावर बेतण्याची शक्यता असते. कोलंबसाचे समकालीन नाविक जेव्हा नवनवे भूभाग शोधण्यासाठी महासागर पार करू लागले तेव्हा या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्यांच्यामध्ये काही अनुभवाचे बोल प्रचलित होते, उदा. ‘सकाळी आकाश लाल झालेलं दिसलं, तर ती धोक्याची सूचना आहे, पण तेच जर रात्री लाल दिसलं तर नाविक खूश होतात’. १८५० च्या दशकात हवामानशास्त्र विकसित होईपर्यंत असा ठोकताळा वापरण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. 

१८५६ साली फेरेल या अमेरिकन शिक्षकाने हवामानाचा आणि विशेषत: वादळांचा अभ्यास करून काही गणिते मांडली आणि हवेच्या दाबाचे पट्टे (आयसोबार) आणि त्यांमधील अंतर यांचा अभ्यास करून वाऱ्यांचा वेग आणि त्यांची दिशा यांची भाकिते करण्याची पद्धत शोधून काढली. या पद्धतीत त्या स्थानाचे अक्षांश, त्यामुळे निर्माण होणारी वाऱ्याच्या दिशेचे विचलन करणारी प्रेरणा (कोरिओलिस फोर्स) आणि वायुभारात निर्माण झालेली घट यांचा एकत्रित परिणाम लक्षात घेऊन काही आडाखे बांधले होते. पुढे नाविकांच्या सोयीसाठी फेरेलच्या गणिती सिद्धांतांवरच आधारित एक सोपी पद्धत १८५७ साली ख्रिस्तोफर बाइज बॅलट या डच शास्त्रज्ञाने शोधून काढली. ती थोडक्यात अशी, ‘‘उत्तर गोलार्धात वाऱ्याकडे तोंड करून उभे राहिले असता वादळाचा केंद्रबिंदू तुमच्या उजव्या हाताला ९० ते १३५ अंशांवर असतो. जर वायुभार १० मिलिबार (आता हेक्टोपास्कल) ने कमी झाला असेल तर तो ९० अंशांवर आणि २० मिलिबारने कमी झाला असेल तर १३५ अंशांवर असतो. आजही दर्यावर्दीमध्ये ‘बाइज बॅलट्स लॉ’ या नावाने ती पद्धत अभ्यासली जाते.

चक्रीवादळ संथ गतीने बहुधा पूर्वेकडून पश्चिामेकडे प्रवास करते. अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांवरील वादळांच्या प्रवासाच्या दिशेचा अंदाज घेण्यासाठी सांख्यिकीचा आणि पुढील १-२-३ पद्धतीचा वापर सध्या केला जातो. गेल्या दहा वर्षांत वादळांनी आक्रमिलेला मार्ग विचारात घेऊन पुढच्या २४, ४८ आणि ७२ तासांमध्ये वादळ कोणता मार्ग घेऊ शकेल त्याचा अंदाज करतात. पहिल्या २४ तासांत १०० सागरी मैल, ४८ तासांत २०० आणि ७२ तासांत ३०० मैलांपर्यंत चुकीला वाव (एरर मार्जिन) ठेवला जातो.

– कॅप्टन सुनील सुळे मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : http://www.mavipa.org    

ईमेल : office@mavipamumbai.org