scorecardresearch

कुतूहल : राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था

या संस्थेमार्फत समुद्रकिनाऱ्याजवळील सागरी क्षेत्राच्या अभ्यासासाठी महत्त्वाच्या सेवा पुरवल्या जातात.

कुतूहल : राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था
संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी’ या संस्थेची स्थापना १ जानेवारी १९६६ रोजी झाली. वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान संस्थेच्या (सीएसआयआर) नियमाप्रमाणे या संस्थेचे कार्य चालते. राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे मुख्य कार्यालय गोव्यातील दोना पावला येथे आहे. याशिवाय कोची, मुंबई आणि विशाखापट्टणम येथे समुद्रविज्ञान संस्थेची प्रादेशिक केंद्रे आहेत. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागराच्या सर्वेक्षणावेळी अभ्यासात लक्षात आलेली बाब म्हणजे भारताभोवती असलेल्या सागरी क्षेत्राची वैशिष्टय़े वेगळी आहेत.

समुद्रविज्ञान संस्थेतील संशोधनात सागरी जलस्रोतांची हालचाल, जैवविविधता, सागरी अन्नसाखळी, खोल पाण्यात व किनाऱ्याजवळील जीवांची मुबलकता, पर्यावरणातील बदलांचा जैवविविधतेवर व अन्नसाखळीवर होणारा परिणाम, सागरी खनिज संपत्तीचा शोध, सागरतळाचे अचूक नकाशे, खनिज तेलाचा शोध, सागरी तळातील बदल, सागरी तळाची निरीक्षणे व रेखाटने करण्यायोग्य यंत्रमानवाचा उपयोग, सागरी संशोधनासाठी उपकरणे विकसित करणे आणि त्यांचा व्यापारी उपयोग अशा विविध कामांचा समावेश होतो.

या संस्थेमार्फत समुद्रकिनाऱ्याजवळील सागरी क्षेत्राच्या अभ्यासासाठी महत्त्वाच्या सेवा पुरवल्या जातात. भरती रेषेपासून सागरात असलेल्या उथळ क्षेत्रास ‘भूखंड मंच’ म्हणतात. भूखंड मंच हा मासे, कालवे, माशांची पिल्ले, शेवंडे, मोती उत्पादन आणि समुद्र वनस्पती उत्पादनासाठी महत्त्वाचा असतो. सुमारे ८० टक्के सागरी अन्न या भागातून मिळते. या भागात होणारे प्रदूषण पूर्ण उत्पादन धोक्यात आणू शकते. समुद्रविज्ञान संस्था भूखंड मंचावरील सागरी क्षेत्रामध्ये होणाऱ्या बदलांची नोंद ठेवते. सागरी पाण्यात अपघाताने सोडलेले बोटीमधील तेल, तवंगाच्या रूपाने किनारपट्टीवर भयंकर परिणाम करते. अशा तेल तवंगास प्रतिबंध, त्याचे पृथक्करण व उपाय सागरी विज्ञान संस्थेमार्फत सुचवले जातात. पाण्याखाली जाऊन प्रत्यक्ष निरीक्षण करणे हा समुद्रविज्ञान संस्थेच्या कामाचा नेहमीचा भाग आहे.

समुद्रविज्ञान संस्थेच्या तीन प्रादेशिक केंद्रांमध्ये कामाचे नियोजन झालेले आहे. मुंबईतील उपकेंद्रात सागरी प्रदूषणाच्या जीवसृष्टीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जातो. सागरी पर्यावरण समस्यांवर उपाय सुचवले जातात. विशाखापट्टणम येथील उपकेंद्रात मुंबई उपकेंद्राप्रमाणेच काम केले जाते. बंगालचा उपसागर व अंदमान निकोबापर्यंतचे सागरी क्षेत्र या उपकेंद्राच्या अखत्यारीत येते. कोची केंद्रामध्ये सागरी जीवशास्त्र आणि त्याच्याशी निगडित रसायनशास्त्र यावर संशोधन केले जाते. सागरी जैवविविधता, प्रवाळांचे आरोग्य, सागरांची खाद्यान्न उत्पादन क्षमता आणि सागरी जीव व जिवाणूंपासून औषध निर्मितीची शक्यता या प्रमुख विषयांवर कोची केंद्रात भर दिला जातो.

डॉ. मोहन मदवाण्णा 

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-01-2023 at 03:46 IST

संबंधित बातम्या