– डॉ. श्वेता चिटणीस

सरंगा म्हणजेच ‘सिल्व्हर पॉमफ्रेट’ला खवय्यांच्या पसंतीमुळे बाजारात प्रचंड मागणी आहे. बाजारात मोठं, रुचकर पापलेट महाग किमतीत विकलं जातं. मच्छीमारांची उपजीविका या माशांवर आधारलेली आहे. मागणीला पुरवठा करण्याच्या हेतूने पापलेटची अपरिपक्व पिल्लं बाजारात विकली जातात. या स्वस्त, लहान पापलेटमध्ये चव आणि पोषणमूल्यं दोन्ही कमी असतात.

बाजारात पापलेट वजनानुसार विकले जातात. ५०० ग्रॅमहून अधिक वजनाचं पापलेट म्हणजे ‘सुपर सरंगा’, ३०० ते ५०० ग्रॅमपर्यंत वजन असलेलं पापलेट म्हणजे ‘एक नंबर’, २०० ते ३५० ग्रॅम पापलेट म्हणजे ‘दोन नंबर’ व १०० ते २०० ग्रॅमचं पापलेट म्हणजे ‘तीन नंबर’! १०० ग्रॅमपेक्षा कमी वजनाची पापलेटं ही लहान, लैंगिक दृष्टीने अपरिपक्व अशी पापलेटची पिल्लं असतात. वर्षानुवर्ष अवैध प्रकारे मासेमारी करण्यामुळे प्रौढ व पूर्ण वजनाचे मासे दुर्मीळ होऊ लागले आहेत आणि सुपर सरंगा ही प्रजाती तर आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

वैज्ञानिक दृष्टीने ही अतिमासेमारीची चिन्हं आहेत. अशी पापलेटं विकत घेऊन आपण अवैध मासेमारीलाच चालना देतो आहोत. पर्ससीन नेट, गिल नेट, मोठाल्या ट्रॉलर्स, मासेमारीसाठी लावण्यात येणारे एलईडी लाइट यामुळे हे मासे इतर मोठ्या माशांसोबत जाळ्यात अडकतात.

गेल्या १२ वर्षांत सुपर सरंगा हळूहळू दुर्मीळ होत चालला आहे, असं सातपाटीच्या मासेमारांचं मत आहे. सागरी परिसंस्थेचा समतोल ढासळून ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गापासून वाचवायची असेल, तर लहान पापलेट विकत घेण्यावर बहिष्कार टाकला गेला पाहिजे असं तज्ज्ञांचं मत आहे.

सिल्व्हर पापलेटच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकारने २०२३ साली या माशास ‘राज्य मासा’ म्हणून घोषित केलं आहे. १३५ ते १४० मिलिमीटरपेक्षा लहान पापलेट पकडण्यावर कायदेशीर बंदी आहे. पापलेटचं चित्र असलेलं तिकीटसुद्धा टपाल खात्यानं काढलं आहे. गुजरातमधल्या वेरावल या ठिकाणी हे मासे प्रजनन करतात. सातपाटी, डहाणू, वसई व उत्तर मुंबईच्या किनार्‍याजवळ आढळणारे हे मासे उथळ वालुकामय किनार्‍यांच्या अधिवासात प्रजनन करतात. छोटे मासे, मृदुकाय प्राणी, स्क्विड व कवचधारी प्राणी हे त्यांचं आवडीचं खाद्य! परंतु अतिमासेमारी, हवामानबदल आणि प्रदूषण याचा परिणाम त्यांच्या खाद्यावरही होऊ लागला आहे.

महाराष्ट्रात पारंपरिक मासेमारी पावसाळ्यात म्हणजे जून महिन्यापासून बंद केली जाते. ती नारळी पौर्णिमेपर्यंत बंदच असते. परंतु या काळात इतर राज्यांतील बोटी महाराष्ट्रात अवैध मासेमारी करतात. थोडक्यात, नैतिक मासेमारीला पाठिंबा देण्यासाठी आणि दुर्मीळ होत चाललेल्या पापलेटचं संवर्धन करण्यासाठी लहान पापलेट विकत घेऊ नयेत.

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org