चिम्पान्झी, गोरिलासोबतच  ओरांगउटानबद्दल माणसाला कुतूहल असते.  ओरांगउटानसंदर्भात सखोल अभ्यास केलेली व्यक्ती म्हणून लिथुनिया-कॅनडा येथे जन्मलेल्या बिरुट मारीजा गाल्डीकास या महिला शास्त्रज्ञ ओळखल्या जातात. सिमॉन फ्रेझर विद्यापीठाच्या या प्राध्यापिकेच्या संशोधनानंतर इतर शास्त्रज्ञांना  ओरांगउटानबद्दल माहिती उपलब्ध झाली. 

‘यूसीएलए’ या लॉस एंजेलिसच्या विद्यापीठात काम करत असताना त्यांची भेट डॉ. लुई लिकी यांच्याशी झाली. नॅशनल जिओग्राफिक सोसायटीच्या संशोधन निधीमुळे बोर्नेओ येथे त्यांचे संशोधन कार्य सुरू झाले. पुढे तब्बल ४० वर्षे त्या या विषयावर संशोधन करत राहिल्या. सस्तन प्राण्यांवर सर्वात प्रदीर्घ काळ चाललेले संशोधन म्हणून याला मान्यता मिळाली आहे. १९७८ मध्ये त्यांना या कार्याबद्दल पीएच. डी. मिळाली. ‘जावा’ समुद्रानजीक बिरुट ग्लाडीकास यांनी आपला संशोधन तळ स्थापन केला होता. येथे नैसर्गिक परिसंस्थेत  ओरांगउटानचे वर्तन, त्याचे अधिवासातील राहणे, आहार आणि विहार यांचा अभ्यास सुरू झाला. त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत ‘ओरांगउटान फाऊंडेशन इंटरनॅशनल’ या लॉस एंजलिसस्थित संस्थेची स्थापना त्यांनी १९८६ मध्ये केली. त्यांचे पती, पाक बोहाप यांनी ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि ब्रिटन येथेदेखील अशा प्रकारच्या संस्थांचे जाळे विणले. त्यामुळे जगभरात या प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाचे कार्य सुरू आहे. पर्जन्यवनांच्या निरनिराळय़ा कारणांनी होत असलेल्या हानीमुळे या वानरकुलीन प्राण्यांच्या जगण्यावर संकट येते, याची जाणीव करून देण्यासाठी बिरुट सतत आवाज उठवत आहेत. आपले पालक गमावलेल्या  ओरांगउटानच्या अनाथ पिल्लांचे संगोपन करण्यासाठी बिरुट विशेष प्रयत्न करताना दिसतात. मोठे झाल्यावर त्यांना जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडण्यावर त्यांचा भर असतो. अन्यथा त्यांना पाळीव प्राणी म्हणून ठेवले जाण्याचा धोका संभवतो.

बिरुट ग्लाडीकास यांनी ‘रिफ्लेक्शन्स ऑफ एडन’, ‘ऑरॅगंउटान ओडिसी’, ‘ग्रेट एप ओडिसी’ ही पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या कार्यावर अनेक चित्रफिती काढण्यात आल्या आहेत. त्यांचा ‘बॉर्न टू बी वाइल्ड’ हा माहितीपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला. ‘नॅशनल जिओग्राफिक’ मासिकाच्या मुखपृष्ठावर दोन वेळा झळकलेल्या बिरुट क्वचित प्रसंगी वादाच्या भोवऱ्यातदेखील अडकल्या. त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ‘अ‍ॅनिमल प्लॅनेट’ या लोकप्रिय वाहिनीवरील मालिकांतदेखील त्यांच्या या कार्याचा आढावा घेतला गेला आहे.

– डॉ. नंदिनी देशमुख

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org