– हेमंत चोपडे

पाणी, वीज, गॅस या घरगुती तसेच औद्योगिक सेवाक्षेत्रामध्ये स्मार्ट मीटर्स आता मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. स्मार्ट मीटर म्हणजे अत्याधुनिक हुशार डिजिटल इलेक्ट्रॉनिक उपकरण. पूर्वीचे डिजिटल मीटर फक्त या गोष्टींच्या वापराची नोंद करायचे आणि कंपनीचा माणूस घरी येऊन त्या मीटरचं रीडिंग घ्यायचा. पण स्मार्ट मीटर रीडिंग घेण्याबरोबरच कंपनीशी स्वत: संपर्क करतं.

स्मार्ट मीटर हे द्विमार्गी संवादक आहेत. म्हणजे जसे ते इतरांशी संपर्क करू शकतात तसे इतरही त्याच्याशी बाहेरून संपर्क करू शकतात. याकरिता त्यामध्ये सिमकार्ड किंवा तत्सम एखादी चिप असते. त्यामुळे स्मार्ट मीटर त्यात नोंद केलेली माहिती किंवा विदा एका निश्चित केलेल्या वेळेवर सेवापुरवठा कंपनीच्या सर्व्हरवर पाठवत राहते.

आपण वीज वापरासंबंधीचे उदाहरण पाहू. एखाद्या ग्राहकाने प्रत्यक्ष वीज कधी आणि किती युनिट वापरली हे समजण्यासाठी स्मार्ट मीटर अत्यंत उपयोगी ठरतं. ग्राहक व कंपनी यांच्यामधील व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो. घरातलं कोणतंही विजेचं उपकरण सुरू केलं की स्मार्ट मीटरमधील अतिसूक्ष्म इलेक्ट्रॉनिक संवेदक म्हणजेच ‘सेंसर’ अनेक गोष्टींची नोंद घेतो. ‘किती व्होल्टेज आहे?’, ‘किती विद्युतधारा (इलेक्ट्रिक करंट) वाहते आहे?’, ‘किती वेळ वीज वापरली?’ या सगळ्यांचा विचार करून त्यानुसार हे मीटर गणित करून वापरलेली युनिट्स मोजतं. प्रत्येक स्मार्ट मीटरमध्ये एक छोटासा संगणक असतो. तो वीज वापराची नोंद ठेवतो. त्या वापराची तारीख व वेळ जतन करतो. किती बिल झालं याचा हिशोब ठेवतो.
सिम कार्ड किंवा तत्सम ‘चिप’च्या माध्यमातून वीज कंपनीला ही माहिती वेळोवेळी पाठवली जाते. यासाठी वायफाय किंवा इंटरनेटची गरज नसते. ती कंपनीच्या स्वत:च्या सुरक्षित नेटवर्कवर पाठवली जाऊ शकते. स्मार्ट मीटर आधी ठरवून दिलेल्या कालावधीने वीज वापराची माहिती वीज कंपनीच्या मुख्य सर्व्हरला पाठवत राहतं. महिन्याच्या शेवटी या माहितीचा वापर करून संगणकाद्वारे वीज देयक तयार होतं.

स्मार्ट मीटर हे मोबाईल रिचार्जप्रमाणे प्रीपेड स्वरूपाचं असू शकतं. त्यातला रिचार्ज संपल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो. वापरकर्त्यासाठी स्मार्ट मीटरमधून मिळणार्‍या माहितीसाठी एखादं मोबाइल ॲपसुद्धा असू शकतं. संबंधित ॲपद्वारे मोबाइलवर एखाद्याला ‘त्याने वीज किती वापरली?’, ‘कधी वापरली?’ आणि ‘त्याचे किती पैसे शिल्लक आहेत?’ हे कधीही पाहता येतं.

थोडक्यात स्मार्ट मीटर म्हणजे वापर अचूक मोजून, तो डेटा स्वत:हून, सेवा देणार्‍या कंपनीपर्यंत पाठवणारं डिजिटल मीटर होय, जे कंपनीबरोबरच वापरकर्त्याशीसुद्धा आवश्यक तो संवाद साधू शकतं.

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org