पॉलिस्टर तंतूची रंगाई प्रक्रिया अत्यंत कठीण व महागडी असते. याशिवाय हे तंतू गडद रंगात रंगविणे शक्य नसते. याशिवाय पॉलिस्टर तंतूंपासून बनविलेल्या सुताची किंवा कापडाची रंगाई प्रक्रिया ही गट प्रक्रियेने (बॅच प्रोसेस) करावी लागत असल्यामुळे विविध गटात रंगाचा एकसारखेपणा व छटेमध्ये सातत्य राखणे कठीण असते. याशिवाय अशा रीतीने रंगवलेल्या तंतूंच्या रंगाच्या  पक्केपणाबद्दलही प्रश्न उद्भवतो. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी तज्ज्ञांनी द्रावण रंगाईचा उपाय शोधून काढला. द्रावण रंगाई पद्धतीमध्ये वितळ कताईच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या बहुवारिकाच्या द्रावणातच आवश्यक ती रंगद्रव्ये मिसळली जातात. या द्रावण मिश्रणापासून तंतूंची वितळ कताई केली जाते. यामुळे या प्रक्रियेने तयार केले जाणारे तंतू स्वाभाविकच रंगीत असतात. अशा पद्धतीने रंगीत अखंड व आखूड या दोन्ही प्रकारच्या तंतूंचे उत्पादन करता येते.
या रंगाई प्रक्रियेने रंगविलेल्या तंतूंच्या रंगात एकसारखेपणा असतो आणि याचा फायदा पुढील प्रक्रियेत व कापडाच्या दर्जात होतो. रंगद्रव्य कताई द्रावणात पूर्णपणे एकजीव होत असल्यामुळे रंगाचा पक्केपणा खूपच चांगला असतो. धुलाई, घर्षण किंवा सूर्यप्रकाश यांचा रंगछटेवर फारसा परिणाम होत नाही. सामान्य प्रकारच्या रंगाई पद्धतीने रंगविलेल्या तंतूंच्या गुणधर्मात, मुख्यत: ताकदीवर मोठा परिणाम होतो. परंतु द्रावण रंगाई पद्धतीने तयार केलेल्या तंतूंच्या गुणधर्मात बदल होण्याची शक्यता नसते. द्रावणरंजित तंतूवरील पुढील प्रक्रिया अधिक सुलभ असतात आणि वाया जाणाऱ्या मालाचे प्रमाण घटते. कापडाच्या रासायनिक प्रक्रियेमध्ये एका ठिकाणचा रंग उडून दुसऱ्या ठिकाणी लागण्याचे प्रकार या तंतूंच्या बाबतीत घडत नाहीत. या प्रक्रियेमुळे गडद व आकर्षक असे रंग देता येतात. या कारणाने ग्राहकांचा प्रतिसाद चांगला असतो. या रंगाई प्रक्रियेची एकच मर्यादा म्हणजे पॉलिस्टर तंतूच्या उत्पादकतेने उत्पादन केलेल्या रंगछटातूनच रंग निवडावे लागतात.
– चं. द. काणे  (इचलकरंजी)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – काश्मिरी पंडित
काश्मिर खोऱ्यातील मूळचे रहिवासी असलेल्या शैवपंथीय हिंदु समाजाला सोळाव्या शतकात ‘पंडित’ असे नाव पडले. पुढे हेच लोक काश्मिरी पंडित म्हणून ओळखले जाऊ लागले. काश्मिरमध्ये इ.स.पूर्व काळात सम्राट अशोकाच्या बौद्ध संख्या वाढून हिंदुधर्मिय लोकसंख्येवर परिणाम झाला.
इ.स.१००३ ते १३२०  या काळात काश्मिरात लोहारा घराण्याच्या हिंदु राजांचा अंमल होता. त्यांच्यापकी शेवटचा शासक सुहदेवाच्या कारकीर्दीत त्याच्या अनागोंदी अकार्यक्षम कारभारामुळे व भ्रष्टाचारामुळे लोकांचे राहणीमान खालावले. सुशिक्षित, पूजाअर्चा सांगणाऱ्या पुरोहितांवर त्याने कर बसविले. अशा असंतुष्ट समाजात इस्लाम धर्मप्रसारकांचे फावले. त्यालाच भर म्हणून लोहारानंतर काश्मिरवर मुस्लीम राज्यकर्त्यांचा अंमल सुरू झाला. यापैकी सुलतान सिकंदर स्वतला बुतशिकन म्हणून घेत असे. त्याने हिंदू आणि बौद्ध यांच्यावर मुस्लीम धर्मातराची सक्ती केली, हिंदू देवतांच्या मूर्ती फोडून त्यांचा छळ सुरू केला. धर्मातर न करणाऱ्या अनेकांनी शेजारच्या राज्यात जाऊन रोजगार, व्यवसाय सुरू केला. मोगल बादशाह अकबराने १५८७ मध्ये काश्मिर घेतले. काश्मिरातील हिंदुंची बुद्धीमत्ता, त्यांची शालीनता यांनी अकबर प्रभावित झाला व या समाजाला सम्राट अकबराने ‘पंडित’ संबोधणे सुरू केले. या पंडितांच्या त्याने आपल्या राज्यक्षेत्रात, अनेक ठिकाणी उच्चपदावर नेमणुका केल्या, शैक्षणिक कार्यात उपयोग करून घेतला, पंडितांना सहिष्णुतेची वागणूक दिली.
परंतु मोगलांची सत्ता जाऊन काही काळ आलेल्या अफगाण सत्ताधाऱ्यांनी परत या पंडितांचा छळ, इस्लाम धर्मातर सक्तीचे करून पंडितांची लोकसंख्या घटवली. काश्मिरच्या डोगरा राज्यकर्त्यांच्या काळात १९४७ सालापर्यंत पंडितांची संख्या एकूण लोकसंख्येच्या १५% होती. सन १९४८  ते १९५० या काळातील धार्मिक दंगली, जमीन विषयक कायद्यांमुळे पंडितांचे स्थलांतर होऊन १९८१ साली पंडितांची संख्या फक्त पाच टक्के राहिली. १९८९ पासूनच्या  सालच्या दहशतवादी कृत्यांमुळे पंडितांची संख्या आणखी रोडावली.
 सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com