scorecardresearch

कुतूहल : प्राण्यांमधील ध्वनिनिर्मिती

माकड किंवा एप हे आवाज निर्माण करताना त्यांच्या जिभेचा वापर अजिबात करत नाहीत.

‘ऐकणे’ आणि ‘बोलणे’ या प्रक्रियांचा संबंध केवळ कान आणि तोंड यांच्याशी नाही, तर तो मेंदूशीदेखील आहे. कोणता आवाज ऐकू आला, याचा अर्थ लावण्याचे काम किंवा कोणता आवाज काढायचा आहे, याचे नियंत्रण प्राण्यांच्या मेंदूत असलेल्या विशिष्ट भागांकडून केले जाते. त्यामुळे ‘ऐकणे’ आणि ‘बोलणे’ या क्षमता विकसित होण्यासाठी केवळ कान आणि स्वरयंत्रच नाही, तर या प्रक्रिया नियंत्रित करणाऱ्या मेंदूतल्या त्या विशिष्ट भागांचा विकास होणेही आवश्यक होते.

उत्क्रांतीच्या प्रक्रियेत वानरसदृश प्राण्यांपासून मानव तयार झाला. या प्रक्रियेत मानवाला जवळचे असणारे चिम्पांझी, गोरिला यांसारखे एप किंवा माकडे यांनाही केवळ विशिष्ट आवाजच काढता येतात. पण मानवी स्वरयंत्राची (लॅिरक्स) विशिष्ट रचना, नाका-तोंडाच्या पोकळीची रचना आणि उच्चारांसाठी जिभेचा आणि ओठांचा वापर करता येणे या सगळय़ाचा एकत्रित परिणाम होऊन आपल्याला बोलणे किंवा शब्दोच्चार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे भाषा निर्माण होऊ शकल्या आणि मानवी संस्कृतीचा उगम भाषा निर्मितीतून झाला.

एप किंवा माकडांच्या तुलनेत मानवाचा घसा हा अधिक लांब असतो पण तोंडाची पोकळी मात्र तुलनेने आकाराने छोटी असते. पण महत्त्वाचे म्हणजे आपल्या घशाच्या किंवा तोंडाच्या पोकळीचा वापर आपण इतर प्राण्यांप्रमाणे केवळ श्वसनासाठी आणि अन्न खाण्यासाठीच न करता वेगवेगळय़ा शब्दांच्या उच्चारांसाठीसुद्धा करतो. तसेच एप किंवा माकडांच्या तुलनेत आपल्या स्वरयंत्राची जागा गळय़ामध्ये जरा खालच्या बाजूला आहे. जेव्हा आपल्या स्वरयंत्रातले स्वरतंतू कंप पावतात, त्याच वेळी आपल्याला आपला श्वास नियंत्रित करता येतो, जे इतर प्राण्यांना शक्य नसते. त्यामुळेच आपल्याला विशिष्ट उच्चारांची निर्मिती करणे शक्य होते.

आपले स्वरयंत्र श्वसननलिकेच्या वरच्या बाजूला असते, मात्र पक्ष्यांचे स्वरयंत्र (सायिरक्स) हे श्वसननलिकेच्या खालच्या बाजूला असते. त्यामुळेच त्यांना विशिष्ट प्रकारचे आणि काहीसे वरच्या पट्टीतले आवाज काढणे शक्य होते.

आपण आपली जीभ धरून ठेवली तर आपल्याला शब्दांचा उच्चार व्यवस्थितपणे करता येत नाही, हे तुम्ही अनुभवले असेल. माकड किंवा एप हे आवाज निर्माण करताना त्यांच्या जिभेचा वापर अजिबात करत नाहीत. त्यांचा आवाज घशाच्या पोकळीतून येतो. एप वानरांमध्ये खाण्याची प्रक्रिया सुरू नसताना त्यांच्या जिभेवरचा मेंदूचा ताबा नाहीसा झालेला असतो. मानवाच्या बाबतीत मात्र जिभेचा विशिष्ट आकार आणि रचना यामुळे शब्दांच्या उच्चारांमध्ये तिचा वापर महत्त्वाचा ठरतो.

– हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sound production mechanisms in animals zws

ताज्या बातम्या