नवदेशांचा उदयास्त : सोव्हिएत उझबेकिस्तान

दिल्लीच्या सुलतान इब्राहिम लोदीचा पराभव करून हिंदुस्तानात १५२६ साली मोगल साम्राज्याची पायाभरणी केली.

रशियन सैनिकांनी १८६८ मध्ये समरकंद घेतले, त्याचे निकोलाय कॅराझीन यांनी काढलेले चित्र. सौजन्य: विकिपीडिया

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

सोळाव्या शतकात तैमूर घराण्याची सत्ता संपून उझबेकिस्तानच्या प्रदेशात तुर्की-मंगोलवंशीय, उझबेक भाषिक शायबानीक घराण्याची सत्ता स्थापन झाली. आत्ता सत्तेचे केंद्र समरकंदहून बुखारा येथे हलविले गेले. १४८३ साली जन्मलेला जहिरूद्दीन मोहम्मद बाबर हा उझबेकिस्तानच्या फरगाना खोऱ्याचा शासक वडिलांकडून सम्राट तैमूरलंगचा पाचवा वारस तर आईकडून चंगीजखानचा वारस होता. १४९७ मध्ये बाबराने समरकंद घेतले. पुढे मोठा राज्यविस्तार करून काबूल घेत त्याने आपला मोर्चा हिंदुस्तानकडे वळविला. दिल्लीच्या सुलतान इब्राहिम लोदीचा पराभव करून हिंदुस्तानात १५२६ साली मोगल साम्राज्याची पायाभरणी केली.

१९ व्या शतकात रशियन साम्राज्याने मध्य आशियात विस्तार सुरु  केला. १८१३ पासून उझबेकी प्रदेशात हातपाय पसरत तो रशियन साम्राज्यात विलीन केला. अनेक रशियन कुटुंबे उझबेकी प्रदेशात स्थायिक झाली. १९१२ मध्ये दोन लाखांहून अधिक रशियन्स उझबेकिस्तानमध्ये होते. रशियात इ.स. १९१७ मध्ये कम्युनिस्ट बोल्शेविक क्रांती झाल्यावर हे कम्युनिझमचे लोण मध्य आशियाई प्रदेशांमध्येही जाऊन पोहोचले होते. पूर्वी उझबेकिस्तानच्या प्रदेशात ताष्कंत, बुखारा आणि समरकंद ही तीन खानेत म्हणजे राज्ये होती. या तिन्ही राज्यांनी रशियन सत्तेबरोबर संरक्षणाचा करार केला होता आणि उझबेकचा बहुतेक प्रदेश त्यामुळे रशियाचाच एक भाग असल्याप्रमाणे झाले. रशियनांनी ताष्कंत येथे राजधानी स्थापन करून या प्रदेशाचे नाव तुर्केस्तान केले. तेथील जबाबदारी रशियन गव्हर्नर जनरलकडे सोपविली. तिथे कापूस लागवडीला प्रोत्साहन देऊन त्यावरची प्रक्रिया आणि सरकीचे तेल काढण्याचे कारखाने सुरू केले. पुढे सोव्हिएत युनियन स्थापन झाल्यावर १९२४ साली उझबेकिस्तानात उझबेक सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक सरकार स्थापन करून एक स्वतंत्र, सोव्हिएत युनियनचा घटक देश स्थापन करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धात १९४१ ते १९४५ या काळात १२ लाखांहून अधिक उझबेकी तरुण रशियन लाल सेनेतून नाझी जर्मनीविरोधात लढले. त्यापैकी अडीच लाखांहून अधिक लढाईत मारले गेले. सोव्हिएत कम्युनिस्ट निधर्मी सरकारच्या स्थापनेनंतर सत्ताधारी बोल्शेव्हिकांनी उझबेकिस्तानमध्ये बहुतेक मशिदी बंद करून त्यांना विरोध करणाऱ्या मुल्लामौलवींची कत्तल केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Soviet era uzbekistan history of uzbekistan zws

ताज्या बातम्या