किर्गिझ प्रदेशावर १७ व्या शतकापासून १९ व्या शतकापर्यंत मंगोल टोळ्या, चिनी मांचुरियन क्विंग साम्राज्य आणि उझबेकी कोकांद खानेतचा अंमल राहिला. या काळात किर्गिजस्तानचा प्रदेश रशियन शब्द किर्गिझिया या नावाने ओळखला जात असे. १९ व्या शतकात मांचू साम्राज्याने रशियाशी झालेल्या तहान्वये त्यांच्या ताब्यातील पूर्वेकडील किर्गिझ प्रदेश रशियन साम्राज्याच्या हवाली केला आणि पुढे १८७६ मध्ये हा संपूर्ण किर्गिझ प्रदेश रशियन झार साम्राज्याचा एक भाग बनला. रशियन साम्राज्यात सामील व्हायला अनेक किर्गिझ नेत्यांचा आणि जनतेचाही विरोध होता. १९१६ साली रशियन सत्तेविरोधी किर्गिजस्तानात झालेला उठाव रशियाने मोडून काढला, पण त्या काळात हजारो किर्गिझ कुटुंबांनी चीनमध्ये स्थलांतर केले. १९१९ मध्ये येथे किर्गिझ कम्युनिस्ट पक्ष स्थापन झाला आणि १९३६ मध्ये येथे सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक सरकार स्थापन होऊन तो सोव्हिएत युनियनचा घटक देश बनला. या काळात किर्गिझिया या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशाचा उल्लेख किर्गिजस्तान या नावाने होऊ लागला. येथील समाजजीवन विकसित होऊन शैक्षणिक, सांस्कृतिक सुधारणा झाल्या; परंतु त्याचबरोबर त्यांच्यावर रशियन भाषेची सक्ती करून ती लादली गेली. स्टालीनच्या दडपशाहीमुळेही अधूनमधून ताणतणाव निर्माण होऊ लागले. त्यातून काही किर्गिझ राजकीय पक्ष निर्माण झाले.

साधारणत: १९८० नंतर किर्गिजस्तानात विविध प्रदेशांतील भिन्न वंशीय लोक येऊन स्थायिक होण्याचे प्रमाण वाढले. किर्गिजस्तानच्या काही प्रांतांमध्ये रशियन लोक किर्गिझ लोकांहून अधिक, काही प्रांतांमध्ये उझबेक अधिक तर काहींमध्ये ज्यू लोकांची संख्या किर्गिझ लोकांहून अधिक झाली. त्यामुळे प्रांतांमध्ये वांशिक संघर्ष आणि दंगली भडकल्या, शेकडो माणसे मारली गेली. या सर्व घटनांचा परिणाम म्हणून किर्गिझ लोकांची स्वातंत्र्यवादी चळवळ सुरू झाली आणि १९९० मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत अस्कार अकायेव्ह हे स्वातंत्र्यवादी नेते विजयी होऊन राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी किर्गिझ सोव्हिएत सोशॅलिस्ट रिपब्लिकचे नाव बदलून रिपब्लिक ऑफ किर्गिजस्तान केले. या काळातच सोव्हिएत युनियनसुद्धा खिळखिळे होऊन कोसळण्याच्या बेतात होते. ऑगस्ट १९९१ मध्ये किर्गिझ राष्ट्राध्यक्ष अकायेव्ह आणि इतर पदाधिकाऱ्यांनी कम्युनिस्ट पक्षाचा राजीनामा देऊन ३१ ऑगस्ट १९९१ रोजी सोव्हिएत युनियनमधून बाहेर पडून स्वतंत्र, सार्वभौम प्रजासत्ताक किर्गिजस्तान अस्तित्वात आल्याची घोषणा केली.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com