अमेरिकेतील स्टॅनफर्ड येथील विद्यापीठातील वैज्ञानिकांनी मानवी शरीरातील एका अगदी नव्या प्रकारच्या जिवाचा शोध लावला आहे. या जिवांना त्यांनी ‘ओबेलिस्क’ असे नाव दिले असून, हे जीव ‘आरएनए’ या आनुवंशिक घटकापासून बनलेले आहेत.
ओबेलिस्क हे जीव जिवाणू, विषाणू किंवा बुरशींपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. त्यांचे रचनात्मक स्वरूप आणि वर्तन हे पारंपरिक विषाणूंप्रमाणे नाही. म्हणून त्यांना ‘व्हायरॉइडसारखे कण’ असे संबोधले जाते. ते शरीरात त्यांचे अस्तित्व टिकवतात, स्वत:ची वाढ करतात, परंतु आजवर कोणत्याही आजाराशी त्यांचा थेट संबंध आढळलेला नाही.
तो गोलाकार असून यातील वर्तुळाकार आरएनए ‘ओबलिन्स’ नावाची नावीन्यपूर्ण प्रथिने तयार करतो. हा आरएनए एक किलोबेस जिनोम (एक हजार बेस जोड्या) इतका लांब असतो. हे गोलाकार नंतर स्थिर दंडाकारात रूपांतरित होतात. हे माणसाला परिसंस्थेत आतापर्यंत माहिती असलेले आकाराने सर्वांत लहान ‘सेल्फ रेप्लीकेटिंग’ आरएनए आहेत. या आरएनएवरील बेस जोड्यांचा अनुक्रम वेगळ्या पद्धतीने उत्क्रांत झाला असावा. या जनुकांचे नेमके कार्य काय आहे, हेदेखील अद्याप उलगडलेले नाही. मानवी मुखात वास्तव्य करणाऱ्या ‘स्ट्रेप्टोकोकस सॅग्युइनीस एसके३६’ या जिवाणूत प्रथमच त्याचे अस्तित्व आढळून आले. स्व-प्रतिकृती प्रणालीचा (सेल्फ रेप्लिकेशन) वापर करून जिवाणूच्या पेशीत ते वाढतात.
हे रहस्यमय आरएनए जीव जगभरातील हजारो लोकांच्या तोंडात लाळेतून ५० टक्के नमुन्यांमध्ये (डेटासेट्स) आणि पचनसंस्थेत साधारण सात टक्के मायक्रोबायोम नमुन्यांमध्ये तसेच मानवी विष्ठेत आढळले आहेत. काही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, हे जीव कदाचित हजारो वर्षांपासून आपल्या शरीरात राहात आहेत, पण अजूनही पूर्णपणे अज्ञात आहेत. शास्त्रज्ञ या कणांचे जीवनचक्र आणि स्व-प्रतिकृती प्रणालीचा अभ्यास करत आहेत. जगभरातून सध्या विविध परिसंस्थांमधून २९ हजार ९५९ ओबेलिस्क्स ओळखण्यात आले आहेत.
आपण शरीरातील सर्व महत्त्वाचे जीव ओळखले आहेत का? जर ओबेलिस्क्स आपली रोगप्रतिकारक क्षमता, चयापचय किंवा इतर कार्यांवर परिणाम करत असतील, तर यामुळे वैद्याकीय उपचारांच्या पद्धतींमध्ये मोठा बदल होऊ शकतो. ही केवळ वैज्ञानिक उत्सुकतेची गोष्ट नाही. हा शोध आपण जीवशास्त्रात काय काय माहिती मिळवली आहे, याबाबतचे मूलभूत गृहीतकच हादरवतो.
आपण आजवर परग्रहावर जीवसृष्टी शोधत आहोत, पण ही शोधमोहीम आपल्याच शरीरात सुरू व्हायला हवी होती, असे हे संशोधन सुचवते. आपल्या शरीरात अजून किती अज्ञात जीवसृष्टी दडलेली आहे, हे कोण जाणे?
– डॉ. रेणू सिंह-मोकाशी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
