‘आई… भूक लागली, पोटात कावळे ओरडायला लागलेत, लवकर काही तरी खायला दे;’ चिंटू खेळून आल्या आल्या ओरडत होता. हातपाय धुऊन आईने दिलेला चिवडा-लाडू खाल्ल्यावर चिंटूला हायसं वाटलं. ‘‘आई, पोटातनं काय आवाज येत होते माहितीये?…’’ तो म्हणाला. ‘‘अरे, शाळेतून आल्यावर काही न खाताच खेळायला गेलास ना? म्हणून असं झालं,’’ आईनं चिंटूला समजावलं.

तुम्हालाही हा अनुभव कधी ना कधी आला असेल ना? तब्येत तर अगदी व्यवस्थित, पण भूक लागली आणि पोटातून आवाज यायला लागले, असं प्रत्येकाच्या बाबतीत कधी ना कधी घडतं. सार्वजनिक ठिकाणी असं झालं तर जरा अवघडल्यासारखंही वाटतं. पण ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे.

भूक लागल्यावर पोटातून येणारे हे आवाज कसले असतील बरं? आपण अन्न खातो ते पचनमार्गातून पुढे जातं. अन्न खाल्ल्यावर आपण दाताने त्याचे तुकडे करतो आणि मग ते गिळतो. गिळल्यानंतर अन्न घशातून आणि अन्ननलिकेतून पोटात, पोटातून लहान आतड्यात आणि मग मोठ्या आतड्यात जातं. त्यानंतर अन्नपचन झाल्यावर, शरीरातले टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. अन्नाचा हा सगळा प्रवास होण्यासाठी अन्न पचनमार्गात पुढे पुढे जायला हवं. त्यासाठी अन्न पुढं ढकललं जाणं आवश्यक आहे. हे कसं होतं?

पचनसंस्थेत अन्न, द्रव आणि वायू, पुढे ढकलताना पोट आणि आतड्यांचे स्नायू आकुंचन पावतात आणि शिथिल होतात. याला ‘आंत्रचलन’ म्हणतात. इंग्रजीमध्ये याला ‘पेरिस्टलासिस’ म्हणतात. या हालचालींमुळेच अन्न आतड्यांतून पुढे सरकतं आणि पचनक्रियेला मदत होते. आतड्यांच्या याच हालचालींमुळे पोटातून आवाज येत असतात.

भूक लागल्यावर आपल्या शरीरात ‘घ्रेलिन’ हे संप्रेरक (हार्मोन) जास्त प्रमाणात तयार होतं आणि मेंदूला खाण्याची वेळ झाली असल्याचा संकेत देतं. पचनसंस्थेला पुन्हा कार्यरत होण्याचे संकेत मिळतात. आतड्यांमध्ये हालचाल सुरू होते, रिकाम्या पोटात हवा आणि पाचक रसांचे मिश्रण असते; आतड्यांमधील हालचालीने हे मिश्रण हलते, याचा परिणाम म्हणजे हे पोटाचं गुरगुरणं. या आवाजाला ‘बॉर्बोरिग्मस’ म्हणतात. घ्रेलिनचं प्रमाण वाढल्यावर पोटातील हालचाली आणखी वेगाने होतात आणि पोट रिकामं असल्यानं त्यातून येणारा आवाजही मोठा वाटतो आणि अगदी स्पष्ट ऐकू येतो. जसं एखाद्या बंद, रिकाम्या खोलीत अगदी हळू बोललं तरी आवाज मोठा वाटतो, तसंच काहीसं इथं होतं. भुकेशिवाय इतर वेळेस पोटातून जर का काही आवाज येत असतील किंवा आवाजाबरोबर इतर काही लक्षणं असतील तर त्याला इतर वैद्यकीय कारणं असू शकतात.

अनघा अमोल वक्टे
मराठी विज्ञान परिषद