उल्का पाटील
शस्त्रक्रिया हा वैद्यकीय विज्ञानातील एक अत्यंत जबाबदारीचा, पण तितकाच रोमांचक भाग आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये, जेव्हा डॉक्टर रुग्णावर उपचार करत असतात, तेव्हा त्यांच्या हातातली प्रत्येक गोष्ट म्हणजे जीव वाचवणारं एक महत्त्वाचं साधन असतं. त्या साधनांची अचूकता, स्वच्छता आणि मजबुती यावरच शस्त्रक्रियेचं यश अवलंबून असतं. म्हणूनच कुतूहल निर्माण होतं की ही साधनं कोणत्या धातूपासून बनवली जातात? ती गंजत नाहीत का? इतकी टिकाऊ कशी असतात? रक्ताच्या संपर्कात येणारी ही धातूची साधनं रक्ताबरोबर काही रासायनिक अभिक्रिया करतात का?

शस्त्रक्रियेसाठी वापरली जाणारी बहुतेक साधनं विशिष्ट दर्जाच्या स्टेनलेस स्टीलपासून बनवली जातात. या स्टीलला ‘सर्जिकल स्टील’ म्हणतात. सर्जिकल स्टीलमध्ये प्रामुख्याने विशिष्ट प्रमाणात लोह, क्रोमियम, मॉलिब्डेनम आणि कधी निकेल मिसळलेलं असतं. हा संमिश्र धातू हवेच्या संपर्कात येतो, तेव्हा क्रोमियम ऑक्सिजनशी अभिक्रिया करून पृष्ठभागावर क्रोमियम ऑक्साइडचा अतिशय पातळ थर तयार करतो. हा थर थोडा खरवडला गेला तरी हवेतल्या ऑक्सिजनमुळे तो पुन्हा तयार होतो. त्यामुळे धातू सुरक्षित राहतो. हा थर धातूला पाणी, रक्त आणि रसायनांपासून संरक्षण देतो, त्यामुळे गंज तयार होत नाही आणि कोणतीही हानीकारक अभिक्रियाही तो होऊ देत नाही. मॉलिब्डेनममुळे ही क्षमता आणखी वाढते, त्यामुळे ही साधनं वारंवार निर्जंतुक केली तरी टिकाऊ राहतात. सर्जिकल स्टीलचा पृष्ठभाग सच्छिद्र नसलेला आणि गुळगुळीत असतो. त्यामुळे रक्त, ऊती आणि सूक्ष्मजंतू साधनांच्या सूक्ष्म भेगांमध्ये अडकू शकत नाहीत. यामुळे या धातूला गंज तर लागत नाहीच शिवाय त्याच्या पृष्ठभागावर जिवाणूंना वाढणंही अशक्य होतं.

शस्त्रक्रियेमध्ये केल्या जाणार्‍या विविध गोष्टींसाठी विशिष्ट संमिश्र धातू वापरले जातात. उदाहरणार्थ, चाकूसाठी ‘कार्बन स्टील’ वापरतात, कारण ते अतिशय धारदार बनवता येतं. तर चिमटा आणि कात्री यांसाठी ‘स्टेनलेस स्टील’ किंवा ‘टंगस्टन कार्बाइड’ वापरलं जातं. कारण हे धातू मजबूत, टिकाऊ आणि दीर्घकाळ धार टिकवणारे असतात. त्याचप्रमाणे शरीरात बसवले जाणारे इम्प्लांट्स, शरीरात बराच काळ रहाणार असल्यामुळे अतिशय सुरक्षित, टिकाऊ आणि शरीराशी सुसंगत अशा धातूंनी बनवले जातात. इम्प्लांट बनवण्यासाठी प्रामुख्याने टायटॅनियमचा वापर केला जातो. शस्त्रक्रियेची साधनं तयार करताना मजबुती, गंजरोधकता, स्वच्छता राखण्याची आणि धार टिकवण्याची क्षमता या गुणांना अत्यंत महत्त्व दिलं जातं. योग्य धातूंची निवड केल्यामुळे ही साधनं सुरक्षित आणि प्रभावी ठरतात. त्यामुळेच आधुनिक शस्त्रक्रिया अधिक अचूक, विश्वासार्ह आणि यशस्वी होते.

– मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org