नवदेशांचा उदयास्त : ताजिकीस्तान

ताजिकीस्तानचा गेल्या सहा वर्षांच्या ज्ञात इतिहासाप्रमाणे हा प्रदेश अनेकविध लोकांचे निवासस्थान बनला.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

मध्य आशियातल्या, कोणाच्याही खिजगणतीत नसलेल्या ताजिकीस्तान या देशाचे नाव ऑगस्ट २०२१ मध्ये ऐकू आले ते तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केला तेव्हा. त्यापूर्वी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी हे पलायन करून प्रथम शेजारच्या ताजिकीस्तानमध्ये पोहोचले आणि तेथून पुढे दुबई येथे. दक्षिणेस, नेहमीच अतिरेकी कारवाया, सत्तासंघर्ष चालत असलेला अफगाणिस्तान हा देश, उत्तरेस किर्गिजस्तान, पश्चिमेस उझबेकीस्तान आणि पूर्वेस चीन अशा या भूवेष्टीत देशाच्या चतु:सीमा आहेत. येथील बहुसंख्य प्रजा फारसी भाषा बोलणाऱ्या ताजिक लोकांची असून सामायिक ऐतिहासिक वारशामुळे संस्कृती आणि जीवनशैली याबाबत अफगाण आणि इराणी लोकांशी त्यांचे बरेच साम्य आढळते. साधारणत: दीड लाख चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या या देशाची लोकसंख्या ९५ लाख आहे. यापैकी ९८ टक्के वस्ती सुन्नी पंथीय इस्लाम धार्मिकांची तर केवळ एक टक्के ख्रिश्चन धर्मियांची आहे. वांशिक विभागणी केल्यास ८६ टक्के लोक ताजिक, ९ टक्के उझबेक आणि बाकी रशियन, किर्गिझ, अफगाण, तातार वगैरे वंशीय आहेत. दुशान्बे हे येथील राजधानीचे शहर सर्वाधिक लोकवस्तीचे शहर आहे. सोव्हिएत युनियनचा घटक असलेला ताजिकीस्तान ९ सप्टेंबर १९९१ रोजी त्या युनियनमधून बाहेर पडून एक सार्वभौम देश म्हणून अस्तित्वात आला. ताजिकीस्तानचा गेल्या सहा वर्षांच्या ज्ञात इतिहासाप्रमाणे हा प्रदेश अनेकविध लोकांचे निवासस्थान बनला. ताजिक या इराणी शब्दाचा अर्थ आहे ‘बिगर तुर्क’. ताजिकी लोक हे मूळचे खरे इराणी आणि त्यामुळे फारसी भाषा बोलणारे. ताजिक लोकांचे स्थान म्हणून त्याचे ताजिकीस्तान झाले. इ.स. पूर्व चार हजारच्या आधीही या प्रदेशात मानवी अस्तित्व असल्याचे अनेक पुरावे सापडले आहेत. येथील प्रसिद्ध नदी अमू दर्या आणि पामीर पर्वताचा परिसर हा महाभारत आणि इतर वैदिक साहित्यात परम कम्बोज किंवा महाजनपद कम्बोज म्हणून वर्णन केलेला परिसर असावा असे मानले जाते. इसवी सनपूर्व काळात दोन शतके हा प्रदेश इराणच्या हखामनी साम्राज्याच्या अमलाखाली राहिला. अलेक्झांडरने इराणी साम्राज्याचा पाडाव केल्यावर काही काळ हा प्रदेश उत्तरेतल्या एका राज्यात राहिल्यानंतर शक टोळ्यांच्या वर्चस्वाखाली आला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tajikistan country profile zws

Next Story
कुतूहल : कार्यालयाची रचना
ताज्या बातम्या