scorecardresearch

भाषासूत्र : उंडगं उठलं, पिठलं हाटलं..

कुटुंबातल्या सगळय़ांच्या समाधानाचा मार्ग सर्वाच्या पोटातूनच जातो, या गोष्टीचा विसर सगुणाबाईंना पडलेला होता.

–  डॉ. माधवी वैद्य madhavivaidya@ymail.com

‘उंडगा/ उंडगी’ या शब्दाचा अर्थ ‘उनाड’ असा आहे. या म्हणीच्या लक्षणकथेपुरता उनाड, गावभर फिरणारी स्त्री असा अर्थ घ्यायचा.

एका गावात एक एकत्र कुटुंब राहात होतं. घरात सासरेबुवा, सूनबाई, नवरा, दोन वाढत्या वयाची मुलं असा परिवार! घरातल्या सुनेचं म्हणजे या दोन मुलांच्या आईचं नाव सगुणा. सगुणाबाई खरंच गुणाच्या होत्या. सर्व कलांत प्रवीण होत्या. दिवसभरात अनेक कामे करण्यात त्या गुंतलेल्या असायच्या. या सर्व कामांमध्ये घरच्या कामांना कुठून वेळ मिळणार? असे त्यांचे  व्हायचे खरे. मग जसा वेळ होईल तसं घरकाम, स्वयंपाकाचा बेत सांभाळायच्या. पण सुंदर दिसणं, पुढे पुढे करणं, नाचरेपणा हा त्यांच्या स्वभावाचा जणू स्थायिभाव. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही व्हायची. कुणी त्यांची ‘आली बघा उंडगी, नाचण मोर आहे नुसती!’ अशा शब्दांत खिल्लीही उडवीत असे.

कुटुंबातल्या सगळय़ांच्या समाधानाचा मार्ग सर्वाच्या पोटातूनच जातो, या गोष्टीचा विसर सगुणाबाईंना पडलेला होता. रात्रीच्या जेवणासाठी गडबड करून घरी आल्यावर झटपट जेवण बनवण्यासाठी, कमी वेळ लागणारा पदार्थ त्या करू लागल्या. मग काय! आठवडय़ातून दोनचारदा पिठलं सोय म्हणून पानात पडू लागलं. खरं तर घरातले सारेच जरा नाराज होऊ लागले, सर्व जण वैतागले होते या पिठल्याला; पण बोलणार कोण? आणि मांजराच्या गळय़ात घंटी बांधणार कोण? शेवटी सासरेबुवांनी ठरवले, आता सूनबाईंना जरा ताकीद दिली पाहिजे. ते त्यांना ऐकू जाईल अशा बेतानी म्हणाले, ‘‘सूनबाई! आज लवकर आलात? म्हणजे आज तरी रीतसर काही मिळेल जेवायला आम्हाला! का म्हटलं आजही पिठलं हाटणार?  म्हणतात ना, ‘उंडगं उठलं, पिठलं हाटलं’ तसं चाललंय तुमचं हल्ली.’’ सगुणाबाईंना आपली चूक लक्षात आली. त्यांनी ती सुधारण्याचा निश्चयही केला.

आधीच कामाचा उल्हास असणाऱ्या आणि नको त्या गोष्टींना प्राधान्य देणाऱ्या स्वभावाबद्दल ही म्हण मार्मिकपणे वापरली जाते.

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Teaching of marathi language marathi learning through zws