पश्चिम आशियातल्या कॉकेशस पर्वत क्षेत्रातील प्रजासत्ताक अर्मेनिया या छोट्या देशाचे नावही मागच्या वर्षापर्यंत विशेष कुणाला माहीत नव्हते. परंतु सप्टेंबर २०२० मध्ये अर्मेनिया आणि त्याचा शेजारी देश अझरबैजान यांच्यामध्ये नागोर्नो काराबाख या छोट्या प्रदेशाच्या मालकीहक्कावरून जो संघर्ष सुरू झाला त्यातील युद्धामध्ये शेकडो लोक मारले गेले. त्यात या दोन्ही देशांच्या बाजूने जगातल्या महासत्ता उभ्या राहिल्याने परत एखादे महायुद्ध उभे राहते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या संघर्षामुळे अर्मेनियाचे नाव चर्चेत आले, ज्ञात झाले.

पूर्वी युनियन ऑफ सोव्हिएत सोशॅलिस्ट रिपब्लिक्स म्हणजेच सोव्हिएत युनियनचा सर्वांत लहान असलेला देश हा अर्मेनिया आहे. सर्व बाजूंनी भूपरिवेष्टित असलेल्या या देशाच्या पश्चिमेस तुर्कस्थान, उत्तरेस जॉर्जिया, पूर्वेस अझरबैझान आणि दक्षिणेस इराण अशा याच्या चतु:सीमा आहेत. यारेवान ही अर्मेनियाची राजधानी. तीस हजार चौ. कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या या देशाची लोकसंख्या ३२ लाख आहे. येथील ९८ टक्के लोकवस्ती ख्रिश्चन धर्मीय आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात येशू ख्रिस्ताच्या बारा शिष्यांपैकी दोघांनी अर्मेनियात ख्रिस्त धर्माची शिकवण देऊन प्रसार केला म्हणून येथील ख्रिश्चन धर्मीयांना अपोस्टेलीक ख्रिश्चन म्हणतात. चौथ्या शतकाच्या सुरुवातीस अर्मेनियाच्या राजाने प्रथम ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि पाठोपाठ प्रदेशातल्या सर्व लोकांनी हा धर्म स्वीकारला. इतर ख्रिश्चन रिवाजांपेक्षा यांचे काही रिवाज वेगळे आहेत. यांचा नाताळ ५ जानेवारीला असतो. हे लोक मृतदेहाचे दहन करून नंतर राखेचे दफन करतात. इ.स. चौथ्या शतकात ख्रिस्ती धर्म स्वीकारणारे अर्मेनिया हे जगातले पहिले राज्य मानले जाते.

jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
Loksatta explained Due to the continuous increase in mustard production, the discussion of yellow revolution is starting
विश्लेषण: देश पिवळय़ा क्रांतीच्या दिशेने..
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

अर्मेनियाचे मूळचे नाव त्यांच्या भाषेत हयस्तान असे आहे. हजारो वर्षांचा इतिहास आणि प्राचीन संस्कृती असलेल्या अर्मेनियाने परकीयांच्या आक्रमणांना तोंड देत अनेक परकीय सत्तांतरे पाहिली आहेत. रोमन साम्राज्य काळात अर्मेनिया हा रोम आणि पर्शिया यांच्या अमलाखाली होता आणि मध्ययुगीन काळात तीन शतके मंगोल आणि इतर टोळ्यांनी अर्मेनियाचा मोठा विध्वंस केला. सोळाव्या शतकात आधीच दुबळा बनलेल्या अर्मेनियाच्या अर्ध्या भागाचा कब्जा तुर्की आटोमान साम्राज्याने तर उरलेल्या अर्ध्या भागाचा ताबा इराणच्या सफाविद साम्राज्याने घेतला.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com