– गिरीश घाटे
प्रवासात गरम चहा किंवा कॉफी नेण्यासाठी आपण थर्मास वापरतो. उन्हाळ्यात थंड पाणी दीर्घकाळ थंड राहावं म्हणूनही त्याचाच उपयोग आपण करतो. एकाच थर्मासमध्ये गरम पदार्थ गरम आणि थंड पदार्थ थंड कसे राहतात, असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. यामागचं रहस्य त्याच्या खास रचनेत दडलं आहे.
थर्मास आतील पदार्थाच्या उष्णतेचा आत-बाहेर होणारा प्रवास शक्य तितका रोखतो. त्यामुळे त्यातील पदार्थ बराच वेळ त्याच तापमानातच राहतात. उष्णता एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी तीन मार्गांनी जाते. हे मार्ग म्हणजे वहन, अभिसरण आणि प्रारण. थर्मास या तिन्ही मार्गांनी होणारं उष्णतेचं संक्रमण अत्यंत कमी करतो.
थर्मासमध्ये एकात एक अशी दोन भांडी असतात. त्यांच्यामधली हवा पूर्णपणे काढून पोकळी तयार केलेली असते. त्यामुळे उष्णतेचं वहन आणि अभिसरण अत्यंत कमी होतं. यामुळे आतील उष्णता बाहेर जात नाही आणि बाहेरची उष्णता आत येत नाही. उष्णतेचा तिसरा मार्ग म्हणजे प्रारण. काचेच्या थर्मासमध्ये आतील भांड्यावर चकचकीत लेप असतो, तर स्टीलच्या थर्मासमध्ये आतील पृष्ठभाग आरशासारखा गुळगुळीत आणि पॉलिश केलेला असतो. हा पृष्ठभाग उष्णतेचे किरण परावर्तित करतो. तसेच हवाबंद झाकणामुळे गरम वाफ बाहेर पडत नाही आणि बाहेरची हवा आत शिरत नाही. त्यामुळे थर्मासमधील पदार्थ बराच वेळ त्याच तापमानात राहतो.
आज बहुतेक थर्मास स्टेनलेस स्टीलचे असतात. काचेचा थर्मास उष्णता आणि चव अधिक काळ टिकवतो पण तो नाजूक असल्यामुळे स्टीलचा मजबूत आणि प्रवासासाठी सोयीचा थर्मास अधिक लोकप्रिय आहे.
थर्मासचा इतिहासही रंजक आहे. सुरुवातीला या उपकरणाचा वापर केवळ प्रयोगशाळांमध्ये केला जात होता. १९०४ मध्ये जर्मनीतील दोन काचकारांनी त्याचा व्यावसायिक वापर सुरू केला. त्यांनी ‘थर्मास’ या नावाने कंपनी स्थापन केली आणि पुढे हेच नाव या उपकरणासाठी रूढ झालं.
थर्मास टिकावा यासाठी तो नियमित स्वच्छ धुवावा, कठीण ब्रश वापरू नये आणि वापर नसताना झाकण उघडं ठेवावं. तसंच दूध किंवा दुधाचे पदार्थ त्यात जास्त वेळ साठवू नयेत. आज काही आधुनिक थर्मासच्या झाकणावर डिजिटल तापमान निर्देशक असतो. तसंच ट्रेकिंग, ऑफिस किंवा शाळेसाठी विविध आकारांचे थर्मास उपलब्ध आहेत.
थोडक्यात सांगायचं तर, थर्मास हे उष्णतेचं संक्रमण कमीत कमी करणार्या विज्ञानाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. विज्ञानातील साध्या तत्त्वांचा कल्पक वापर करून तयार केलेला हा आविष्कार आज आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य साथीदार झाला आहे.
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
