वृक्षाची ओळख त्याच्या कुळाबरोबरच त्याचा आकार, उंची आणि पर्णसंभाराने होत असते पण यापेक्षाही त्याची खरी ओळख म्हणजे त्याच्यावर कुणाची मालकी आहे, शासनाची की वैयक्तिक. अनेक ठिकाणी शासन, वन विभाग, लोकनियुक्त संस्था यांच्या माध्यमातून सरकारी, अथवा शासनमान्य जागेवर वृक्ष लागवड होते आणि हा शासनाचा, वन विभागाचा अथवा शासकीय संस्थेच्या मालकीचा वृक्ष आहे व तो कायद्यानुसार संरक्षित आहे हे दर्शविण्यासाठी वृक्षाच्या ठरावीक योग्य वाढीनंतर त्याच्या मजबूत खोडावर गोलाकार पद्धतीने सारख्याच आकाराचे व उंचीचे पांढरे तांबडे पट्टे जमिनीपासून १.५ मीटपर्यंत रंगवले जातात.

सहसा महामार्ग किंवा राज्य रस्त्यांच्या दुतर्फा हे आपणास नेहमी दृष्टीस पडते. यातील पांढरा रंग म्हणजे चुना अर्थात कॅल्शियम हायड्रॉक्साइड असतो तर तांबडा रंग कॉपर सल्फेटचा असतो. दोन्हीही रसायने पाण्यामध्ये वेगवेगळी विद्राव्य करून मोठय़ा ब्रशच्या साहाय्याने खोडावर एकसारख्या पद्धतीने दाट रंगवली जातात. अनेक वेळा जमिनीलगतच्या ३/४ भाग पांढरा तर वरचा १/४ भाग तांबडा असतो. काही ठिकाणी ४०: ३०: ४० च्या प्रमाणात तांबडा, पांढरा, तांबडा रंग दिला जातो. पांढऱ्या रंगामधील चुनखडी म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साइड ही बुरशीनाशक असते. अनेक वेळा त्यात गंधकसुद्धा मिसळतात. रात्री वाहनाच्या समोरच्या दिव्याच्या प्रकाशात हा पांढरा रंगवलेला भाग उजळून निघतो त्यामुळे चालकांना रस्ता दुतर्फा सांभाळून वाहन सुरक्षित चालवण्याचे मार्गदर्शन मिळते.

तांबडय़ा रंगामधील कॉपर सल्फेट झाडाच्या नवीन येणाऱ्या सालीचे उन्हाळय़ात रक्षण करते. त्यास तडे जाऊ देत नाही. या दोन्हीही रसायनांच्या पट्टय़ामुळे खोडाचे काहीही नुकसान होत नाही, जमिनीखालील कीटक झाडावर चढत नाहीत त्याचबरोबर झाडांचे वाळवीपासून रक्षण होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो वृक्ष शासनाच्या मालकीचा असून त्यास तोडल्यास आपण शिक्षेस पात्र ठरतो हे नागरिकांच्या मनावर बिंबविले जाते. या पद्धतीने शासकीय वृक्षगणना करणेसुद्धा सोपे होते. अनेक ठिकाणी खोडांना तांबडा रंग देण्यासाठी नैसर्गिक गेरू मातीचा उपयोग होतो. या मातीमुळे खोडाला गारवा मिळतो, त्यातील आयर्न ऑक्साइड झाडाचे वाळवीपासून रक्षण करते. राजस्थान या उष्ण प्रदेशात ही पद्धत वापरली जाते. वृक्ष खोडांच्या या वैज्ञानिक रंग पद्धतीमध्ये ऑइल पेन्ट वापरण्यास संपूर्ण बंदी आहे. निसर्ग आणि विज्ञानाचा अनोखा संगम असलेली ही वृक्ष संरक्षणाची पद्धत फक्त भारतीय उपखंडातच वापरली जाते हे विशेष आहे.

– नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org