सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

१९९१ साली सार्वमत घेऊन तुर्कमेनिस्तान सोव्हिएत युनियनमधून बाहेर पडून स्वतंत्र झाले. २६ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत युनियन बरखास्त झाले. १९९१ मध्ये स्वतंत्र देश झाल्यापासून सपार्मुरात नियाझोव्ह हे तुर्कमेनिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. पुढे संसदेत ठराव मंजूर करून घेऊन ते तहहयात राष्ट्राध्यक्ष झाले. डिसेंबर २००६ साली त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते राष्ट्रप्रमुखपदी राहिले. त्यांच्या मृत्यूनंतर राष्ट्राध्यक्ष झालेले गबरेगुलाय हे आता सध्याचे तुर्कमेनिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि विशेष म्हणजे तेसुद्धा त्यांच्या या पदावर तहहयात राहणार आहेत! तुर्कमेनिस्तान सोव्हिएत युनियनमधून मुक्त जरी झाले असले तरी तिथे सरकारची दडपशाही, मानवाधिकारांची गळचेपी या नित्याच्या बाबी आहेत. येथे माध्यमांना पुरेसे स्वातंत्र्य नाही, अल्पसंख्याकांना नियंत्रित अधिकार, धार्मिक आचरणांवर बंधने या गोष्टींमुळे सरकारवर आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संघटना दोषारोप करीत असतात. तुर्कमेनिस्तान हा देश, तिथे चालणाऱ्या प्रचंड भ्रष्टाचारामुळेही कुप्रसिद्ध आहे. शिक्षण क्षेत्र, विधि क्षेत्र यामध्ये मोठय़ा प्रमाणात येथे भ्रष्टाचार चालतो. पोलीस प्रमुख, उपराष्ट्रपती वगैरे उच्चपदस्थ लोकही या भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेले आहेत. अगदी अनाथ मुलांना दत्तक घेण्याच्या सरकारी औपचारिकतेत मोठी लाच दिल्याशिवाय हे काम होत नाही. न्याय क्षेत्रातही राष्ट्राध्यक्ष त्यांना हवा तसा हस्तक्षेप करीत असतात. २००८ साली तुर्कमेनिस्तान संसदेने राज्यघटनेत काही सुधारणा करून गुन्हेगाराला मृत्युदंडाची सजा देणे बंद केले आहे.

तुर्कमेनिस्तानच्या भूमीत तेल आणि नैसर्गिक वायूंचे मोठे साठे आहेत. तेल आणि नैसर्गिक वायूंचा जगात सर्वाधिक साठा असलेल्या देशांमध्ये तुर्कमेनिस्तानचा चौथा क्रमांक आहे. तसेच जगातील सर्वाधिक कापूस उत्पादकांमध्ये या देशाचा दहावा क्रमांक आहे. तेल आणि नैसर्गिक वायू, तसेच कापसाच्या निर्यातीपासून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे तुर्कमेनिस्तानची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभी आहे. येथील तेल आणि नैसर्गिक वायूची निर्यात प्रामुख्याने चीन आणि इराणला होते. तुर्कमेनिस्तान ते चीन आणि इराणपर्यंत वेगवेगळ्या पाइपलाइन्स या पुरवठय़ासाठी मुद्दाम बांधण्यात आल्या आहेत. रशिया, इराण, सिंगापूर, चीन, दक्षिण कोरिया, यू.के. या देशांमध्ये तुर्कमेनि कापसाला मोठी मागणी आहे. ‘मानत’ हे तुर्कमेनिस्तानचे चलन आहे.