विज्ञान प्रयोगशाळा म्हणजे विविध रसायनांनी केलेली गर्दी, त्यांचा दर्प, काचपात्रे, परीक्षानळय़ा, प्रयोगांसाठी इतर उपयुक्त साहित्य आणि त्यात गुंतून गेलेले पांढऱ्या शुभ्र अॅप्रनमधील धीरगंभीर चेहऱ्याचे शास्त्रज्ञ, असे काहीसे चित्र आपल्या डोळय़ांसमोर उभे राहते. मात्र यास अपवाद आहे अमेरिकेतील अॅरिझोना विद्यापीठात वृक्ष वाढचक्र संशोधन (लॅब ऑफ ट्री रिंग रिसर्च) या प्रयोगशाळेचा. येथे काचभांडी, विविध रसायने, त्यांचा दर्प आणि विज्ञान प्रयोगशाळेसाठी हवी असणारी स्वच्छता असे काहीही तुम्हाला दिसणार नाही. येथे असते फक्त विविध वृक्षांच्या ओंडक्यांची गर्दी. सर्वत्र पसरलेला भुसा, खोडांच्या पातळ चकत्या आणि त्यांचे सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने अवलोकन करणारे अनेक शास्त्रज्ञ! या प्रयोगशाळेत प्रवेश केल्यावर सर्वप्रथम आपणास तेथील वासावरून घनदाट जंगलात जात आहोत, असा भास होतो. नंतर वाटते आपण लाकडाच्या वखारीत तर नाही ना? पण लगेच तेथील संशोधनाचे रहस्य उलगडते. या निसर्गविज्ञान प्रयोगशाळेत पृथ्वीच्या पाठीवर असलेल्या हजारो वर्षे जुन्या प्राचीन वृक्षांचे वय त्यांच्या खोडामधील वाढचक्रावरून मोजले जाते आणि त्या अभ्यासामधून भूतकाळातील प्रदीर्घ दुष्काळ, जंगलाला लागलेले वणवे, कीटकांचा वृक्षांवर झालेला हल्ला, उष्णतामान, ज्वालामुखी, भूकंप या नैसर्गिक घटनांचा अभ्यास केला जातो. या प्रयोगशाळेची स्थापना १९३७ मध्ये ‘अॅन्डर्य़ू लिकॉट डग्लस’ या अंतराळ विज्ञान अभ्यासकाने केली. सुरुवातीला या निसर्ग प्रयोगशाळेत विज्ञानाच्या साहाय्याने फक्त वाढचक्रांचाच अभ्यास होत असे. आता त्यासोबत रेडिओ कार्बन डेटिंगचाही वापर होतो. येथील शास्त्रज्ञांचा चमू जगामधील सात खंडांतील विविध जंगलांत असलेल्या अज्ञात प्राचीन वृक्षांच्या कायम शोधात असतो. येथे प्रयोगशाळेच्या भिंतीवर खोडांच्या अनेक गोलाकार चकत्या टांगलेल्या आढळतात आणि त्यावर त्या वृक्षाचे नाव, तो कुठे आढळला आणि त्याचे वय लिहिलेले असते. आफ्रिकेतील अनेक पुरातन वृक्षांचे वय येथे मोजण्यात आले असून, त्यातील बऱ्याच बॉवबॉब वृक्षांचे वय पाच हजार वर्षांच्या पुढे आहे. प्रयोगशाळेला जोडूनच वृक्षसंग्रहालयसुद्धा आहे.
आज पृथ्वीवर वातावरण बदलाचे नवे संकट घोंगावत आहे. वृक्षांच्या साहाय्याने हजारो वर्षांपूर्वीच्या भूतकाळात डोकावून या आजच्या संकटास कसे सामोरे जाता येईल हे शोधण्यासाठी आता या प्रयोगशाळेत नव्यानेच वातावरण बदल हा कक्षसुद्धा सुरू करण्यात आला आहे. या ट्री रिंग प्रयोगशाळेमधील संशोधन हे नेहमी उच्च दर्जाचे आणि दिशादर्शक ठरले आहे.
– डॉ. नागेश टेकाळे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa. org
संकेतस्थळ : www.mavipa.org
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: University of arizona laboratory of tree ring research zws