scorecardresearch

भाषासूत्र : या कानातली बाळी त्यात कानात..

आपण न केलेल्या कामाच्या उगाचच बढाया मारणे, दुसऱ्याच्या कामाचे श्रेय स्वत:कडे घेणे हेही त्या सहज करीत असत.

– डॉ. माधवी वैद्य madhavivaidya@ymail.com

आपण आपल्या अवतीभवती अशी काही माणसं बघतो की, ती काही विशेष उद्योग करत नसतात, पण आपण खूप काही कामे ओढतो आहोत, कामात खूपच व्यग्र आहोत असे भासवत असतात. त्यांच्या बाबतीत ही म्हण वापरली जाते.

शांताबाईंचंच उदाहरण घ्या ना! त्या फार मजेशीर होत्या. आपण फार कामात असतो, आपल्याला अजिबात वेळच नसतो, अशी प्रौढी मिरवण्यात त्यांना फार समाधान मिळत असे. खरे तर काम नाही आणि धाम नाही. उचलला फोन, लाव कानाला आणि मार गप्पा.. अशी वागण्याची रीत. आपण न केलेल्या कामाच्या उगाचच बढाया मारणे, दुसऱ्याच्या कामाचे श्रेय स्वत:कडे घेणे हेही त्या सहज करीत असत. हे सारे त्यांच्या सुनेच्या लक्षात येत होतेच. काही दिवस तिने तिकडे डोळेझाक केलीदेखील, पण नंतर नंतर तिला हे सर्व सहन होईना. त्यांच्या या वागण्यावर चांगला उपाय करून त्यांचे पितळ आता उघडे पाडले पाहिजे, असे तिने ठरवले.

एके दिवशी तिच्या सर्व मैत्रिणी तिच्याकडे भिशीसाठी आलेल्या असताना गप्पांच्या ओघात एक मैत्रीण म्हणाली, ‘‘तुझ्या सासूबाई कसल्या उद्योगी आहेत गं, काय काय करत असतात त्या!’’ त्यावर सून म्हणाली, ‘‘कसल्या उद्योगी? तसं भासवण्यात मात्र त्या खूपच यशस्वी होतात. म्हणजे आज भिशीच्या पुरणपोळय़ासुद्धा त्यांनीच केल्या आहेत असं सांगितलं असेल त्यांनी तुम्हाला. होय ना? आणि म्हणाल्याही असतील, ‘दमले गं बाई सगळं करून. जरा विश्रांती घेते गं.. पडते जरा.’ पण हे सर्व नाटक बरं का! काही करत नाहीत त्या! आज सगळं मीच केलंय खरं तर. त्यांचं वर्णन करायचं तर ‘रिकाम्या बाई धंदा काय करशी, तर या कानातली बाळी त्या कानात घालशी’ असंच करावं लागेल!’’ हे ऐकून सगळय़ाच जणी आश्चर्यचकित झाल्या.

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Useful phrases in marathi sentence in marathi zws

ताज्या बातम्या