वेंकटगिरी साडी

आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्य़ातील ऐतिहासिक महत्त्वाचे वेंकटगिरी हे एक शहर.

वेंकटगिरी साडी

आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्य़ातील ऐतिहासिक महत्त्वाचे वेंकटगिरी हे एक शहर. सुती हातमागाच्या साडय़ांसाठी हे प्रसिद्ध आहे. इथे तयार होणाऱ्या साडय़ा वेंकटगिरी म्हणून ओळखल्या जातात. हातमागावर विणल्या जाणाऱ्या या साडय़ा जामदनी पद्धतीच्या असतात. तसेच सुती जरीकाठी साडी हे या साडीचे आणखी एक वैशिष्टय़ आहे. मऊसूत आणि टिकाऊ हे दोन गुणधर्म या साडीची आणखी एक ओळख आहे. सहसा सहावारी असलेली ही साडी भारतातील सर्व मोसमात वापरता येते. जामदनी पद्धतीमधले पदरावरील मोठय़ा मोरांचे, पोपटांचे, राजहंसाचे, आंब्याचे डिझाइन ही या साडीची खासियत आहे. अतिशय तलम आणि जरीकामामुळे विशेष मागणी असलेली रुबाबदार साडी असे या साडीचे वर्णन करता येईल.
अगदी सतराव्या शतकापासून विणली जाणारी ही साडी पूर्वी फक्त राजघराण्यासाठी तयार केली जायची. त्याचा भरघोस मोबदला विणकरांना मिळायचा. वेंकटगिरी साडीमध्ये बांगलादेशाकडून आयात केलेले जामदनी पद्धतीचे डिझाइन विणायला सुरुवात झाल्यानंतर त्याची मागणी सर्वत्र वाढली. आपण देऊ ते डिझाइन विणून देण्याची क्षमता इथल्या विणकरांमध्ये आहे. एकूण ४०,००० व्यक्तींना रोजगार पुरवणाऱ्या या कामात २०,००० विणकर सहभागी आहेत. साध्या रंगाईच्या आणि विणाईच्या बाबतीत अद्ययावत असणारे हे एक केंद्र आहे. पूर्वी बाहेरून सूत रंगवून आणले जायचे, त्याऐवजी रंगाईचे एक आधुनिक केंद्र इथे उभारण्यात आले आहे. बदलत्या काळाबरोबर राहण्याची ही कृती इतर अनेक साडी उत्पादन करणाऱ्या केंद्रांनी अनुकरण करण्यासारखी आहे.
वेंकटगिरी ही साडी तलम असल्यामुळे ती काळजीपूर्वक आणि हाताने धुतली पाहिजे. ही साडी धुताना कठीण पाण्याचा वापर टाळायला हवा. धुताना वापरला जाणारा निर्मलकही सौम्य असावा. एखाद्या वेळी ड्रायक्लिनिंगचा वापर करायला हवा. या पद्धतीने काळजी घेतल्यास ही साडी टिकण्यास चांगली मदत होईल. पूर्वी स्थानिक राजांनी आश्रय दिला होता, तर आता लोकाश्रय मिळाला आहे, त्यामुळे ही साडी आपले मानाचे स्थान टिकवून आहे.

दिलीप हेर्लेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

 

संस्थानांची बखर

त्रिपुरा संस्थानातील प्रशासकीय सुधारणा

त्रिपुरा राज्याचे, माणिक्य घराण्याचे संस्थापक शासक महामाणिक्य यांच्यानंतर एकूण ३५ माणिक्य राजांची कारकीर्द झाली. बीरचंद्र माणिक्य या राजाची कारकीर्द इ. स. १८६२ ते १८९६ अशी झाली. या राजाने ब्रिटिशांच्या प्रशासकीय पद्धतींचा अभ्यास करून त्यापैकी अनेक बाबींचे अनुकरण केले. १९०५ साली त्याने अगरताळा म्युनिसिपालिटी स्थापन केली. १८९० मध्ये उमाकांत अकादमी ही पाश्चात्य पद्धतीची शाळा सुरू केली. आधुनिक अगरताळ्याचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे बीरचंद्र माणिक्य हे स्वत एक विख्यात छायाचित्रकार होते.
त्यांचे पुत्र राधाकिशोर माणिक्य यांची कारकीर्द सन १८९६ ते १९०९ अशी झाली. १९०५ पूर्वी पोलीस खात्यातील लोकांनाच महसूल खात्याचे काम करावे लागत असे. राधाकिशोरने ती दोन खाती वेगवेगळी केली. कलकत्ता येथील आर. जी. कार मेडीकल कॉलेज आणि अद्ययावत रुग्णालय उभारण्यासाठी या राजाने मोठे अर्थसाह्य दिले. त्याच्या कारकीर्दीत राज्यात अनेक वेळा भूकंप झाले. १८९७ साली झालेल्या मोठय़ा भूकंपात राधाकिशोरने भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन आणि अर्थसहाय्य केल्यामुळे तो एक लोककल्याणकारी शासक म्हणून ओळखला जातो.
यानंतरचे, बिरेंद्र किशोर माणिक्य याची कारकीर्द सन १९०९ ते १९२३ अशी झाली. राज्याच्या विकासासाठी या राजाने केलेल्या प्रयत्नांमध्ये चहाच्या लागवडीचे तज्ज्ञ नियुक्त करून चहाच्या ४० मळ्यांची लागवड केली. बर्मा ऑईल कंपनीला बिरेंद्र माणिक्यने त्रिपुरामध्ये नसíगक तेल व वायूचे उत्पादन करण्यासाठी ठेका दिला आणि अगरताळा येथे रेशीम विणकामाचे केंद्र सुरू केले. बिरेंद्रने राज्याचे दहा प्रशासकीय विभाग करून चीफ सेक्रेटरीचे पद निर्माण केले. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी त्याने नागरी सेवा परीक्षा विभाग सुरू केला.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Venkatgiri saree