उल्का पाटील
‘ड’ जीवनसत्त्व हे हाडांच्या मजबुतीसाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असलेलं एक महत्त्वाचं पोषक-तत्त्व आहे. याला ‘सनशाईन व्हिटॅमिन’ असंही म्हटलं जातं; कारण ते मुख्यत: सूर्यप्रकाशाच्या मदतीनं शरीरात तयार होतं. सूर्यप्रकाश हा ‘ड’ जीवनसत्त्व शरीरात तयार करणारा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत आहे.

‘ड’ जीवनसत्त्वाचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम, हे शरीराला रक्तातून कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषून घेण्यास मदत करतं. त्यामुळे हाडं मजबूत राहतात आणि दात निरोगी राहतात. लहान मुलांमध्ये हाडांची योग्य वाढ होण्यासाठी ते खूप आवश्यक आहे. या जीवनसत्त्वामुळे प्रौढ व्यक्तींना हाडं ठिसूळ होण्यापासून संरक्षण मिळतं. तसंच ‘ड’ जीवनसत्त्व रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करतं. काही संशोधनानुसार ते हृदयविकार, मधुमेह आणि मानसिक तणाव कमी करण्यासही सहाय्यक ठरू शकतं. स्नायूंची ताकद टिकवून ठेवण्यातही त्याचा महत्त्वाचा वाटा असतो. आपल्या त्वचेच्या बाह्य् थरात ‘७-डीहायड्रोकोलेस्टेरॉल’ हा नैसर्गिक घटक असतो. सूर्यप्रकाशातून ‘अल्ट्राव्हायोलेट-बी’ किरणं त्वचेवर पडतात, तेव्हा किरणांच्या ऊर्जेमुळे हा घटक, रासायनिक प्रक्रियेद्वारे ‘प्री-व्हिटॅमिन डी३’मध्ये बदलतो. शरीरातील उष्णतेमुळे या प्री-व्हिटॅमिन डी३चं रूपांतर व्हिटॅमिन डी३मध्ये होतं. त्वचेमध्ये तयार झालेलं हे व्हिटॅमिन डी३ रक्तात मिसळतं आणि नंतर यकृत व मूत्रपिंड याद्वारे प्रक्रिया होऊन १,२५-डायहायड्रॉक्सी व्हिटॅमिन डी या ‘सक्रिय ड’ जीवनसत्त्वामध्ये रूपांतरित होतं. हे ‘सक्रिय ड’ जीवनसत्त्व शरीरातल्या विविध कार्यांसाठी उपयोगी ठरतं.

थोडक्यात सांगायचं तर, सूर्यप्रकाश आणि त्वचेतलं कोलेस्टेरॉल यांचा संपर्क आल्यावर शरीरात नैसर्गिकरीत्या ड जीवनसत्त्व तयार होतं.जर शरीराला पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही तर शरीरात पुरेसं ड जीवनसत्त्व तयार होत नाही. त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. मुलांमध्ये ‘रिकेट्स’ नावाचा आजार होऊन हाडं वाकडी होऊ शकतात. प्रौढांत ऑस्टिओपोरोसिस होऊन हाडं कमकुवत व ठिसूळ होतात. वारंवार थकवा येणं, स्नायू दुखणं, पाठदुखी, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं आणि मन उदास राहणं अशा तक्रारीही दिसू शकतात. दीर्घकाळ कमतरता राहिल्यास अस्थिभंगाचा (फ्रॅक्चरचा) धोका वाढतो. म्हणून दररोज सकाळच्या सौम्य उन्हात १५ ते २० मिनिटं फिरणं फायदेशीर ठरतं. वैज्ञानिक अभ्यासानुसार, सकाळी दहा ते दुपारी दोनच्या दरम्यानच्या उन्हात ‘अल्ट्रा व्हायोलेट बी’ किरण सर्वात जास्त असतात, ज्यामुळे ड जीवनसत्त्व लवकर तयार होतं. सनस्क्रीन वारंवार लावल्यास ड जीवनसत्त्व तयार होण्याची प्रक्रिया मंदावते.
उल्का पाटील
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org