जलक्षेत्रात सकारात्मक काम करणाऱ्या अनेक व्यक्तींमध्ये डॉ. राजेन्द्र सिंह यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांचा जन्म ६ ऑगस्ट १९५९ साली, दौला या बागपत जिल्ह्यामधील छोटय़ा गावात झाला. शालेय शिक्षण घेत असताना १९७४ साली गांधी शांतता अभियानाचे थोर नेते रमेश शर्मा यांच्या कार्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला. १९७५ मध्ये त्यांनी तरुण भारत संघ या समाजसेवी संस्थेमार्फत समाजसेवेला सुरुवात केली आणि ‘जेथे गरज तेथे मी’ या विचारात अल्वार जिल्ह्य़ामधील किशोरी गाव येथे पोहचले. तो दिवस होता २ ऑक्टोबर १९८५. डॉ. राजेन्द्र सिंह यांनी तेथून जवळच असलेल्या गोपालपुरा येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. अस्वच्छ पाणी हेच सर्व रोगाचे मूळ कारण आहे हे त्यांच्या लक्षात आले. अल्वारमध्ये भयंकर पाणीटंचाई होती, नद्या कोरडय़ा पडल्या होत्या. पाण्यावाचून शेती उजाड झाली होती, माणसे शहराकडे स्थलांतरित होत होती. हे सर्व पाहताना त्यांना तेथील गावप्रमुख मंगूलाल मीना भेटले. मीना यांनीच डॉ. राजेन्द्र सिंह यांना लोकांसाठी स्वच्छ घोटभर पाण्याची व्यवस्था कर असे सुचविले आणि या जलपुरुषाची पाणी शोध यात्रा सुरू झाली. परिसरामधील युवकांना बरोबर घेऊन त्यांनी उजाड पडलेल्या पारंपरिक ‘जोहड’ या पाण्याच्या स्रोताची खोली वाढवली, पावसाचे पाणी त्यात जमा होऊ लागले. लोकांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. राजेन्द्र सिंह यांनी असे ४९० पारंपरिक जोहड जिवंत केले, लोकांना पिण्यास पाणी मिळू लागले. त्यांनी लोकसहभागातून कोरडय़ा पडलेल्या अल्वार नदीला १९९५ मध्ये उगमापासून फक्त जिवंतच केले नाही तर बारमाही वाहते केले. या जलक्षेत्रामधील सर्वश्रेष्ठ कामाबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय नदी पुरस्कार मिळाला. त्यावेळचे राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांनी या कामास प्रत्यक्ष भेट दिली. यातून प्रेरणा घेत त्यांनी अजून चार नद्यांना वाहते केले. या भागामधील शेती पुन्हा बहरली. स्थलांतर थांबले आणि दुष्काळी अल्वारबरोबरच राजस्थानमधील इतर ११ जिल्हे आणि ८५० गावे सुजलाम सुफलाम झाली. डॉ. राजेन्द्रसिंह यांना त्यांच्या पाणी क्षेत्रामधील कार्याबद्दल २००१ मध्ये मॅगसेसे पारितोषिक, २००५ मध्ये जमनालाल बजाज पुरस्कार तर २०१५ मध्ये स्टॉकहोम जल पुरस्कार मिळाला. नदीबरोबर बोलणारा, तिच्या दु:खाने व्याकूळ होणारा हा जल अवलिया आजही कोरडय़ा नदीकाठाने अनवाणी फिरत असतो. त्याचे ध्येय एकच असते, सर्वाना बरोबर घेऊन परत या मातेला वाहते करावयाचे.

– डॉ. नागेश टेकाळे

Devendra Fadnavis always telling lies Criticism of Sushilkumar Shinde
रेटून खोटे बोलण्याचे फडणवीसांवर संस्कार; सुशीलकुमार शिंदे यांचा टोला
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
beed district loksabha marathinews, dhananjay munde marathi news
मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी धनंजय मुंडे यांचा बैठकांवर जोर, मराठा भवन बांधून देण्याचे आश्वासन
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray
“तुमच्या जाण्यायेण्याचा खर्च मी करतो, फक्त तुम्ही…”; उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांना खुली ऑफर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org