हवा दिसत नसली तरी तिला वजन असतं. वातावरणातल्या हवेच्या वजनाने पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडणारा जोर म्हणजेच हवेचा दाब. समुद्रसपाटीपासूनची उंची, तापमान आणि आर्द्रता यांचा परिणाम हवेच्या दाबावर होत असतो.
गुरुत्वाकर्षणामुळे हवेतल्या वायूंचे रेणू, धूलिकण आणि बाष्प, पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे खेचले जातात आणि त्यांचं प्रमाण जमिनीलगत वाढल्यानं तिथल्या हवेची घनता जास्त होते. परिणामी हवेचा दाब सर्वाधिक राहतो. जसजसे उंच जाऊ, तसा गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव कमी झाल्याने हवेची घनता कमी होते, ती विरळ होते आणि तिचा दाब कमी होत जातो. सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी उष्णता सर्व ठिकाणी सारखी नसते. विषुववृत्तावर सर्वात जास्त तर विषुववृत्तापासून जसजसे उत्तर ध्रुवाकडे व दक्षिण ध्रुवाकडे जाऊ तशी ती कमी होते. त्यामुळे पृथ्वीवर तापमानाचे पट्टे निर्माण होतात आणि या तापमानाच्या पट्ट्यांनुसार हवेच्या दाबाच्या पट्ट्यांची निर्मिती होते.
तापमानाचा परिणाम हवेच्या घनतेवर होतो आणि पर्यायाने हवेच्या दाबावरही होतो. उबदार हवा प्रसरण पावल्याने तिची घनता कमी होते आणि त्यामुळे तिचा दाब कमी होतो. त्याउलट थंड हवा आकुंचन पावल्याने तिची घनता वाढून दाब वाढतो. हवेतली आर्द्रता म्हणजेच पाण्याची वाफ ही कोरड्या हवेपेक्षा हलकी असते. कोरड्या हवेत जड वायू जास्त असल्याने ती जड असते आणि दाब जास्त असतो. हवेतल्या वाढलेल्या आर्द्रतेमुळे हवेची घनता कमी होते आणि हवेचा दाब कमी होतो.
हवेचा दाब मोजण्यासाठी वायुभारमापक म्हणजेच ‘बॅरॉमीटर’ हे यंत्र वापरलं जातं. मिलिबार म्हणजे एमबी किंवा हेक्टोपास्कल म्हणजे एचपीटी हे त्याचं एकक आहे. हवेचा दाब समुद्रसपाटीवर सुमारे १०१३ मिलिबार असतो. वातावरणातील तपांबरामध्ये दर आठ मीटर उंचीला अंदाजे एक मिलिबार दाब कमी होतो.
समुद्रसपाटीपासूनच्या उंचीप्रमाणे सूर्याच्या उष्णतेमध्ये फरक पडतो. त्यामुळे हवेच्या दाबातही फरक निर्माण होतो. जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हवा वाहते. पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याने आणि हवा उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहात असल्याने तिला गती मिळून वारे तयार होतात. वायूचे वस्तुमान, पृथ्वीच्या पृष्ठभागाचे असमान तापमान आणि वारे या सर्वांचा हवेच्या दाबावर परिणाम होतो.
हवेचा उच्चदाब साधारणपणे स्वच्छ, निरभ्र आकाश आणि शांत हवामान दर्शवतो. याउलट हवेचा कमी दाब वादळी वारे, ढगाळ वातावरण व पाऊस निर्माण करतो. कमी दाबाच्या ठिकाणी हवा गरम होऊन वर जाते. त्यामुळे ती थंड होऊन ढगांची निर्मिती होते आणि पाऊस पडतो.
– अनघा शिराळकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
