– प्रज्ञा नाडकर्णी
अनेकदा वाढत्या वयानुसार झालेली झीज, संधिवात, अवयवांमधले जन्मजात दोष, अपघात इत्यादी कारणांमुळे शरीरातले सांधे नादुरुस्त होतात. अशा वेळी त्यांचा उपयोग करताना मोठ्या प्रमाणावर वेदना होतात. मानवी शरीरातल्या अशा खराब, झिजलेल्या किंवा निकामी झालेल्या नैसर्गिक सांध्यांच्या जागी बसवल्या जाणार्या मानवनिर्मित सांध्यांना ‘कृत्रिम सांधे’ म्हणतात.
जेव्हा एखादी हालचाल करताना सतत वेदना व्हायला लागतात; चालणं, बसणं, उठणं यासारख्या क्रिया करणं कठीण व्हायला लागतं; दैनंदिन कामात मर्यादा यायला लागतात; औषधं, फिजिओथेरपी किंवा इंजेक्शन यांनी आराम मिळत नाही, तेव्हा कृत्रिम सांध्यांचं प्रत्यारोपण करणं अत्यावश्यक आणि प्रभावी ठरतं. गुडघा, खुबा, कोपर, खांदा, कमरेचा सांधा या प्रकारच्या सांध्यांमध्ये वेदना कमी करून हालचाल पूर्ववत करणं हा कृत्रिम सांधे बसवण्यामागचा मुख्य उद्देश असतो.
हे सांधे मानवी शरीरात शस्त्रक्रिया करून बसवले जात असल्यामुळे, ते बनवताना काही महत्त्वाच्या बाबींचा विचार करावा लागतो. सांधे मजबूत, दीर्घकाळ टिकणारे, गंजरोधक आणि मानवी शरीराशी सुसंगती साधणारे असे ‘बायोकंपॅटिबल’ म्हणजेच जैवसुसंगत असतील याची काळजी घेतली जाते.
यासाठी अतिशय मजबूत, हाडांना घट्ट धरून ठेवतील आणि जे शरीरातल्या द्रवांशी कोणतीही अपायकारक रासायनिक अभिक्रिया करणार नाहीत असे, स्टेनलेस स्टील, कोबाल्ट, क्रोमिअम व टायटॅनियम यांसारखे मिश्र धातू वापरले जातात. शिवाय कृत्रिम सांध्यांमध्ये घर्षण कमी करण्यासाठी एक उच्च घनता असलेल्या प्लास्टिकचा मऊ पृष्ठभाग वापरला जातो. विशेष ॲक्रेलिक सिमेंटचा वापर करून कृत्रिम सांधा नैसर्गिक सांध्याशी जोडला जातो. या सिमेंटला ‘बोन सिमेंट’ म्हणजेच हाडांचं सिमेंट असं म्हटलं जातं.
काही आधुनिक सांध्यांमध्ये, चिकणमाती, ॲलुमिना, झिरकोनिया यासारख्या अजैविक आणि अधातू खनिजांपासून बनवलेले सिरॅमिक घटक वापरलेले असतात जे थोडे कठीण, उष्णतारोधक व गंजरोधक असतात.
हे सर्व पदार्थ शरीरात दीर्घकाळ सुरक्षित राहतील, संसर्ग कमी होईल आणि व्यक्तीला नैसर्गिक हालचालीसारखा अनुभव मिळेल अशा प्रकारे काळजीपूर्वक निवडले जातात.
कृत्रिम सांध्यांमुळे माणसाच्या वेदना लक्षणीयरीत्या कमी होतात, त्याची हालचाल सुधारते आणि त्याला सहजसुलभरीत्या दैनंदिन कामं करता येतात. अपघातामुळे परावलंबित्व आलेल्या व्यक्ती किंवा खेळताना दुखापत झालेले खेळाडू, यांना पुन्हा पूर्ववत कार्यक्षम आयुष्य जगणं सोपं जातं.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे सांधे १५ ते २० वर्षं किंवा त्याहून अधिक काळ टिकतात. म्हणूनच कृत्रिम सांध्यांची निर्मिती ही एक वैज्ञानिक किमया किंबहुना वरदान असून त्यामुळे एक वेदनारहित, तणावमुक्त, क्रियाशील व गुणवत्तापूर्ण जीवन जगणं माणसाला शक्य झालं आहे.
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
