नायट्रोजन हे आवर्तसारणीतील पंधराव्या गणातील (श्रेणीतील) सर्वात हलके मूलद्रव्य! सात अणुक्रमांक असलेला नायट्रोजन हा अधातू आहे. या श्रेणीतील मूलद्रव्यांना निक्टोजेन किंवा नायट्रोजन गटातील मूलद्रव्य असेही म्हटले जाते. निक्टोजेन (Pnictogen) या ग्रीक शब्दाचा अर्थ गुदमरवणारा वायू.

नायट्रोजनची संयुगेही पाचव्या शतकापासून शास्त्रज्ञांना ज्ञात होती. अमोनिअम क्लोराइड हे संयुग, नवसागर (sal ammoniac) म्हणून ओळखले जात होते. मध्य युगात नायट्रिक आम्ल, अमोनियम आणि नायट्रेटचे क्षार तसेच सोने विरघळवणारे अम्लराज (हायड्रोक्लोरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल यांचे मिश्रण) याविषयी संशोधन झालेले होते. असे असले तरी नायट्रोजनचा शोध १७७२ मध्ये डॅनिअल रुदरफोर्ड यांनी लावला. नायट्रोजन हा पूर्ण वेगळा रासायनिक पदार्थ आहे. हे जरी रुदरफोर्ड यांना कळले नसले, तरी हवेतील हा घटक ज्वलनास मदत करीत नाही. पण तो कार्बनडाय ऑक्साइडपेक्षा वेगळा आहे हे समजले होते.

१७७२ मध्येच कार्ल शील याने हवा हे दोन वायूंचे मिश्रण असते असा सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार हवेतील एक वायू – ज्वलनशील (ऑक्सिजन) आणि दुसरा सदोष हवा (foul air) म्हणजे नायट्रोजन असतो. खरं तर त्या वेळी शास्त्रज्ञांचं हवेमधील घटकांवर संशोधन चालू होतं. हेन्री कॅव्हेंडिश, जोसेफ प्रिस्टले आणि कार्ल शील यांना हवेतील ऑक्सिजन वेगळा करताना नायट्रोजन मिळाला. नायट्रोजनचे गुणधर्म तपासताना या वायूत धरलेली मेणबत्तीची ज्योत विझली. नायट्रोजन वायूत उंदिर ठेवला असता तो मृत झाला, असे निष्कर्ष त्यांनी मांडले. फ्रान्सच्या ए.एल. लेव्हॉझिएने ‘नायट्रोजन हे एक मूलद्रव्य आहे’, असे सिद्ध केले. जीवनाला मदत करत नाही म्हणून या वायूला लेव्हॉझिएने ‘अझोट’ (जीव नाही या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून) हे नाव दिले. नायट्रोजन हा पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच ‘नायटर’ या खनिजाचा एक घटक आहे; हे कळल्यावर १७९० मध्ये फ्रान्सच्या ‘जीन अँटोनी क्लॉड चॅप्टल’ या रसायनशास्त्रज्ञाने या वायूचे नामकरण नायट्रोजन असे केले.  विश्वात आढळणाऱ्या विपुल मूलद्रव्यांमध्ये नायट्रोजनचा सहावा क्रमांक लागतो. पृथ्वीच्या वातावरणात आकारमान लक्षात घेता ७८ टक्केनायट्रोजन असतो. याशिवाय उल्का, अशनी, ज्वालामुखीतून आणि खाणीतून बाहेर पडणारे वायू तसेच काही खनिज जलांमध्ये नायट्रोजन आढळते.

– अनघा वक्टे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org