आपल्या त्वचेला, केसांना, डोळ्यांना जो नैसर्गिक रंग मिळतो तो ‘मेलॅनिन’ नावाच्या रंगद्रव्यामुळे! ‘मेलॅनोसाइट्स’ या रंगद्रव्य उत्पादक पेशीमुळे मेलॅनिनची त्वचेखाली निर्मिती होते. मेलॅनिनचं प्रमाण जास्त असेल तर त्वचा गडद रंगाची व प्रमाण कमी असल्यास उजळ असते. काही लोकांच्या शरीरावर म्हणजे चेहरा, केस, हात, पाय इत्यादी भागांवर पांढरे डाग आढळतात. याचं कारण म्हणजे या व्यक्तींमध्ये ‘मेलॅनोसाइट्स’ पेशी नष्ट झालेल्या असतात. त्यामुळे अर्थातच मेलॅनिनची निर्मिती थांबते आणि कोडाचे पांढरे डाग दिसू लागतात. कोडाची सुरुवात कोणत्याही वयात होऊ शकते.
शास्त्रज्ञांच्या मते ‘कोड’ हा रंगद्रव्य कमी होण्याचा एक स्वयंप्रतिरोधक म्हणजेच ‘ऑटो-इम्युन’ असा विकार आहे. सामान्यत: आपली शरीराची प्रतिकारयंत्रणा परकीय जिवाणू आणि विषाणूंवर हल्ला करून आपल्या शरीराचं संरक्षण करते. परंतु काही कारणाने ही यंत्रणा आपल्याच निरोगी पेशींना अपघाताने नष्ट करते. अशाच प्रकारे जेव्हा निरोगी मेलॅनोसाइट्स पेशी नष्ट होतात तेव्हा त्या व्यक्तीमध्ये मेलॅनिनच्या कमतरतेमुळे कोड उद्भवतं.
मेलॅनिनच्या निर्मितीप्रक्रियेतील अवरोधांची अनेक कारणं आहेत. पर्यावरणीय घटक, जसं की तीव्र सूर्यप्रकाश किंवा अतिनील किरणांमुळे, शरीरात एक प्रकारचा तणाव निर्माण होतो आणि परिणामी ‘मेलॅनोसाइट्स’ नष्ट होतात. कधी त्वचेला झालेली गंभीर दुखापत, भाजणं, हानीकारक रसायनांचा संपर्क इत्यादीमुळे कोड उद्भवतं. तर कधी थायरॉइड, टाइप-१-मधुमेह, संधिवात यांसारखे ऑटोइम्युन आजार असणार्या व्यक्तींमध्येही कोड पसरण्याची शक्यता बळावते. आई-वडिलांपैकी कोणाला कोड असल्यास, आनुवंशिकतेनुसार मुलांमध्ये कोड उद्भवण्याची संभावना असते. तीव्र मानसिक, शारीरिक ताण-तणावामुळेसुद्धा कोड उद्भवतं.
अंगावर कोड येणं हा कायमस्वरूपी विकार आहे. परंतु तो संसर्गजन्य मात्र नाही. स्पर्शामुळे, एकत्र जेवल्याने किंवा संपर्कामुळे तो इतरांना होत नाही. कोडग्रस्त व्यक्तींमध्ये सामान्यपणे नैराश्य व चिंता प्रकर्षाने आढळते. त्यांना सामाजिक कुचंबणा सहन करावी लागते. त्यांच्या मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर मोठा परिणाम दिसून येतो. अशा व्यक्तींसाठी समुपदेशक व त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं हितावह ठरतं.
आहारात कृत्रिम रंगयुक्त, ग्लुटेनयुक्त, चहा-कॉफीसारखे कॅफीनयुक्त पदार्थ टाळून संतुलित आहार घेणं, पुरेशी झोप घेणं, हळद, आलं, दालचिनी, डाळिंब यांचं सेवन करून मानसिक आणि शारीरिक तणाव कमी करणं, कोवळ्या सूर्यप्रकाशातून ‘ड’ जीवनसत्त्व मिळवणं; अशा निरोगी सवयी अंगीकारल्यास कोडग्रस्त व्यक्तींना दिलासा मिळतो. कोड जरी पूर्णपणे बरं होत नसलं, तरी कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान वापरून आनुवंशिक, वैद्यकीय आणि इमेजिंग डाटा एकत्र करून, कोडाचं अचूक निदान करून, कोडग्रस्त व्यक्तींवर, आधुनिक पद्धतीने उपचार करता येतात.
-प्रीती बेंद्रे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
