हे वाक्य वाचा – ‘मी आणि माझे दोघं मित्र आज सिनेमाला जाणार आहोत’. या वाक्यात ‘माझे दोघं मित्र’ हा शब्दप्रयोग चूक आहे. मित्र हा शब्द नाम, पुल्लिंगी एकवचनी आहे. त्याचप्रमाणे या शब्दाचे अनेकवचन मित्र असेच होते. जसे एक देव-अनेक देव ; एक पर्वत-  अनेक पर्वत, तसेच अनेक मित्र.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नियम असा आहे, की नाम हे पुल्लिंगी, अकारान्त असेल, तर त्याचे अनेकवचन तेच राहते. फक्त वाक्यात योजताना हे शब्द कर्तृस्थानी (कर्ता) असल्यास, त्यांना लागणारी विशेषणे विकारी असल्यास ती अनेकवचनी होतात आणि क्रियापदेही अनेकवचनी होतात. जसे – मला माझा आवडता मित्र भेटला/ सारेच माझे आवडते मित्र आहेत. वरील वाक्यात ‘माझे दोघं मित्र’ यात चूक आहे कारण मित्र पुरुष आहेत, म्हणून माझे दोघे मित्र हे बरोबर आहे. दोघे, तिघे, चौघे हे शब्द पुल्लिंगी आहेत. या शब्दांतील ‘घे’ या अक्षरावर मात्रा आहे. या एकाराऐवजी अनुस्वार(घं) येत नाही. या शब्दाच्या उच्चारात ‘घ’ हे आघातयुक्त नाही किंवा लेखनात एकाराऐवजी अनुस्वार देता येणार नाही. पतिपत्नी या शब्दात पती- पु. पत्नी- स्त्री. आहे. ‘ती दोघे (घं) माझ्याकडे आली होती’. या वाक्यात ‘ती’ हे – ‘ते’ याचे अनेकवचनी सार्वनामिक विशेषण – ती आहे. त्यामुळे इथे ती दोघे – दोघं अशी रूपे होतील. मात्र दोन मुलगे, दोन मित्र किंवा दोन भाऊ असतील, तर ते दोघे असेच लिहिणे व उच्चारणे योग्य आहे. लिखाणात तरी माझे दोघं मित्र – भाऊ, मुलगे अशी चूक करू नये.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When and where verbs plural friend universal adjectives akp
First published on: 17-01-2022 at 00:09 IST