– मानसी राजेश हुले

दैनंदिन जीवनात माणसांना रात्री किंवा अंधूक प्रकाशात नीट दिसत नाही. मात्र निसर्गाने काही प्राण्यांना अशी अद्भुत क्षमता दिली आहे की ते पूर्ण अंधारातही सहज हालचाल करू शकतात. अशा प्राण्यांना ‘निशाचर’ प्राणी म्हणतात.

घुबड हा पक्षी रात्री अत्यंत सहजी पाहू शकतो. त्याचे डोळे मोठे असल्यामुळे त्याच्या डोळ्यात प्रकाश शोषून घेण्याची क्षमता जास्त असते. हरीण, कोल्हा, कुत्रा आणि गाय यांनाही कमी प्रकाशात पाहण्याची क्षमता असते. जंगलात राहणार्‍या प्राण्यांना शत्रूपासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी ही क्षमता उपयोगी पडते. मगर, साप यांसारख्या सरपटणार्‍या प्राण्यांनाही रात्री पाहता येतं. खोल समुद्रात राहणार्‍या माशांना पूर्ण अंधारात पाहण्यासाठी डोळ्यांची विशेष रचना असते.

सर्व प्राण्यांच्या डोळ्यांच्या रेटिनामध्ये म्हणजे दृष्टीपटलामध्ये दोन प्रकारच्या पेशी असतात झ्र् शंकू पेशी आणि दंड पेशी! शंकू पेशी उजेड असताना आणि रंग ओळखताना उपयोगी पडतात, तर दंड पेशी कमी प्रकाशात हालचाल आणि आकार ओळखण्यासाठी मदत करतात. माणसाच्या डोळ्यांत दंड पेशींचं प्रमाण कमी असल्यामुळे त्याची रंगदृष्टी चांगली असली तरी अंधारात पाहण्याची क्षमता मात्र कमी असते. निशाचर प्राण्यांच्या डोळ्यांत मात्र दंड पेशींचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे अगदी कमी उजेडातही त्यांना आजूबाजूची हालचाल कळते.

अनेक प्राण्यांच्या डोळ्यांच्या दृष्टीपटलाच्या मागे परावर्तक थर असल्यामुळे उपलब्ध असलेला थोडासाच प्रकाश अधिक प्रभावीपणे वापरला जातो. या थरामुळे प्रकाश डोळ्यातल्या डोळ्यात परत फिरतो आणि त्यामुळे तोच प्रकाश दुसर्‍यांदा वापरला जातो. साहजिकच अंधारात दिसण्याची क्षमता वाढते.
त्यांच्या डोळ्यांचा आकार आणि डोळ्यातल्या भिंगाची आणि बाहुल्यांची रचना कमी प्रकाशासाठी अनुकूल असते. माणसाच्या डोळ्यांतल्या बाहुल्याही कमी अधिक प्रकाशानुरूप लहान-मोठ्या होतात. रात्री दिवे मालवल्यावर होणार्‍या अंधारात आपल्याला काही काळाने दिसायला लागतं. कारण आपल्या डोळ्यांतल्या बाहुल्या जरा अधिक उघडतात आणि जास्तीचा प्रकाश डोळ्यात घेतात. अशा वेळी कोणी पटकन दिवा लावला तर आपल्या मोठ्या उघडलेल्या बाहुल्यांना तो प्रकाश सहन होत नाही, आपण पटकन डोळे बंद किंवा किलकिले करतो. निशाचर प्राण्यांच्या डोळ्यांची बाहुली माणसापेक्षा जास्त उघडू शकते, त्यामुळे त्यांना अधिक प्रकाश डोळ्यात घेता येतो. मांजर गटात मोडणार्‍या प्राण्यांच्या डोळ्यांतल्या बाहुल्यांची उघडण्याची क्षमता माणसाच्या क्षमतेच्या तीनपट जास्त असते.

निसर्गाने प्रत्येक प्राण्याला त्याच्या गरजेनुसार खास क्षमता दिल्या आहेत. काळोखात पाहण्याची क्षमता ही त्यातली एक अद्भुत देणगी असून ती प्राण्यांच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org